राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होणार? काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले…

Nana Patole : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची वज्रमुठ दाखविण्यासाठी मतदार याद्यांमधील घोळ होत असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत आहे. नुकतीच सर्वपक्षीय नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत याबाबत चर्चा केली. आता राज्य निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत जिल्ह्याधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या शिष्टमंडळात मनसे प्रमुख राज ठाकरे देखील सहभागी झाले होते.
त्यामुळे राज ठाकरे यांच्या उद्धव ठाकरे यांच्या राजकीय युतीच्या चर्चा सुरू असतानाच ते या शिष्टमंडळात सहभागी झाल्याने महाविकास आघाडीत जाणार असल्याच्या चर्चा होत आहेत. पण गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसे आघाडीत सहभागी होणार असल्याच्या प्रश्नावर नव्या भिडूची गरज नसल्याचे विधान करत मनसेला विरोध दर्शवला होता. आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मनसेच्या आघाडीतील प्रवेशाबाबत मोठी माहिती दिली आहे.
महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, ते राज ठाकरेंबाबत दिल्लीला प्रस्ताव पाठवतील आणि हायकमांकडून निरोप आल्यानंतर राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत निर्णय घेतील, अशी महत्वाची माहिती नाना पेटोले यांनी दिली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतील सहभागाबाबत काय निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
निवडणूक आयोग भाजपचा बाहूला
नाना पटोले यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करत नरेंद्र मोदी यांचे सरकार देशात आले तेव्हापासूनचे निवडणूक आयोगाचे कार्यालय हे भाजपचे कार्यालय झाले असून तिथूनच भाजपचे कामकाज चालते, असा आरोप केला आहे. तसेच निवडणूक आयोग भाजपचा बाहूला बनला असून लोकशाहीचा खून त्यांनी केल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला आहे.
नाना पटोलेंची मागणी
नाना पटोलेंनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका उपस्थित केली. चुका करण्यापेक्षा निवडणूक आयोगाने त्या दुरुस्त करायला पाहिजे, निवडणुका या पारदर्शक झाल्या पाहिजे. याद्या तयार करण्यासाठी वेळ वाढवून दिला पाहिजे, याद्या करेक्ट झाल्या पाहिजे. नंतरच लावल्या पाहिजे, या मागण्या असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस: गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं; म्हणाले “आनंद दिघे, एकनाथ शिंदें आणि…”





