Pune : शिक्षणाला हवी वसाहतवादी मानसिकतेतून मुक्ती; पारंपरिक ज्ञानाची जपणूक गरजेची : डॉ. भूषण पटवर्धन
Pune : भारतीय शिक्षण व्यवस्थेतून वसाहतवादी मानसिकता दूर करून पारंपरिक ज्ञानाला आधुनिक शिक्षणाची जोड द्यावी, असे मत डॉ. भूषण पटवर्धन यांनी पुण्यात व्यक्त केले.

Pune : भारतीय पारंपरिक ज्ञानशाखांना आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून पुनर्जीवित करण्याची गरज असून त्याकडे संशोधक वृत्तीने पाहणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. भूषण पटवर्धन यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या कोथरूड येथील संतश्री ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित ३१ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी पद्मश्री प्रा. गेशे नगवांग सामटेन, डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे आणि यूएसएच्या पर्ड्यू विद्यापीठाचे डॉ. मकरंद हस्तक, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. रविराज सिथाराम व डॉ. दत्ता दंडगे उपस्थित होते.
भारतीय शिक्षण व्यवस्था आजही वसाहतवादी मानसिकतेत अडकली असून त्यात आमूलाग्र बदल करून माणूस घडवणारे शिक्षण देणे आवश्यक असल्याचे पटवर्धन यांनी नमूद केले. वारकरी संप्रदाय या शिक्षण प्रणालीला बळ देतो आणि महाराष्ट्रातील सामाजिक सलोख्यामागे या संप्रदायाचा मोठा प्रभाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचवणे, सद्गुणांची जोपासना करणे आणि जीवनाचा हेतू स्पष्ट करणे हा या उपक्रमाचा गाभा असल्याचे डाॅ. विश्वनाथ कराड यांनी सांगितले.
डॉ. राहुल कराड यांनी उच्च शिक्षणातील बदलांची गरज अधोरेखित करत विद्यार्थ्यांना मन आणि बुद्धीने सक्षम करण्यासाठी लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर कार्यरत असल्याचे नमूद केले; तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात अंतर्गत शांततेचे महत्त्व त्यांनी विशद केले.





