Pune Mahalaxmi Temple : सारसबागेतील महालक्ष्मी मंदिर 51,000 पणत्यांनी उजळले; ‘पाणी वाचवा, पृथ्वी वाचवा’चा संदेश
Pune Mahalaxmi Temple : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सारसबागेतील श्री महालक्ष्मी मंदिरात ५१ हजार पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. दीपोत्सवातून पाणी वाचवा, पृथ्वी वाचवा हा संदेश देण्यात आला.

Pune Mahalaxmi Temple : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सारसबागेजवळील श्री महालक्ष्मी मंदिरात ५१ हजार पणत्या प्रज्वलित करून भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. यंदाच्या दीपोत्सवातून ‘पाणी वाचवा, पृथ्वी वाचवा’ हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे.
विविध रंगांच्या पणत्या, आकर्षक रोषणाई आणि फुलांच्या सजावटीमुळे मंदिर परिसर उजळून निघाला होता. ही सजावट पाहण्यासाठी देवीभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल यांच्या संकल्पनेतून मंदिरात आकर्षक पुष्परंगावली आणि दिव्यांची आरास करण्यात आली.
ट्रस्टचे प्रमुख संस्थापक व विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी, डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा आणि निलेश लद्दड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आयोजनासाठी पुढाकार घेतला. विश्वकर्मा विद्यालय आणि विश्वकर्मा विद्यापीठातील शिक्षक व विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.
यावेळी प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, पाणी हे जीवन आहे. त्यामुळे पाण्याची बचत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पाण्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने यंदा दीपोत्सवातून हा संदेश देण्यात आला.
बळीराजावरील संकट दूर होऊन प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश यावा, अशी प्रार्थनाही देवीचरणी करण्यात आली. समाजातील अज्ञान आणि वाईट विचारांचा अंधार दूर होऊन सर्वत्र सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, अशी भावनाही या दीपोत्सवातून व्यक्त करण्यात आली.





