Indian man in Russian Army : शिक्षणासाठी गेलेल्या मुलाने रशियाचे स्वीकारले नागरिकत्व, सैन्यातही भरती; परत आणण्यासाठी पित्याची न्यायालयात धाव
विशेषतः मॉस्कोमध्ये शिक्षणाची व्यवस्था करणाऱ्या मध्यस्थासोबत त्या तरुणाने नेमका कोणता करार केला होता, याबाबत स्पष्टता नसल्याचे न्यायालयाने म्हटले.

Indian man in Russian Army – रशियाचे नागरिकत्व स्वीकारून रशियन सैन्यात भरती झालेल्या भारतीय वंशाच्या तरुणाला मायदेशी परत आणण्याची आपली क्षमता अत्यंत मर्यादित असल्याचे केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.
सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर एका पित्याच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. रशिया-युक्रेन संघर्षात अडकलेल्या आपल्या मुलाला परत आणण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी या पित्याने याचिकेद्वारे केली आहे.
केंद्र सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, संबंधित तरुणाने रशियन सैन्यात भरती होण्यापूर्वीच भारतीय नागरिकत्व सोडले होते आणि रशियाचे नागरिकत्व स्वीकारले होते. त्यामुळे या प्रकरणात भारत सरकारची भूमिका मर्यादित राहू शकते.
खंडपीठाने केलेल्या टिप्पणीनंतर, सरकार या तरुणाच्या सुटकेसाठी मानवी दृष्टिकोनातून हस्तक्षेप करण्यासह सर्व संभाव्य पर्यायांचा शोध घेईल, असे आश्वासन मेहता यांनी दिले. मात्र, तो आता रशियन नागरिक म्हणून त्यांच्या सैन्यात कार्यरत असल्याने, त्याच्याबद्दलची माहिती न देण्याचा पूर्ण अधिकार रशियन अधिकाऱ्यांना असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तरुणाने स्वतःच सोडले भारतीय नागरिकत्व
या प्रकरणातील अनेक पैलू अद्याप अस्पष्ट असल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. विशेषतः मॉस्कोमध्ये शिक्षणाची व्यवस्था करणाऱ्या मध्यस्थासोबत त्या तरुणाने नेमका कोणता करार केला होता, याबाबत स्पष्टता नसल्याचे न्यायालयाने म्हटले.
संबंधित तरुणाने भारतीय नागरिकत्व सोडून रशियन नागरिकत्व स्वीकारल्याची माहिती रशियन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर, केंद्र सरकार यात हस्तक्षेप करू शकते का, अशी विचारणाही न्यायालयाने केली. यावर संबंधित मंत्रालयाकडून सूचना घेऊन मानवी मदतीच्या शक्यतेवर विचार केला जाईल, असे मेहता यांनी सांगितले.
नेमके प्रकरण काय?
याचिकाकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा एप्रिल महिन्यात शिक्षणासाठी रशियाला गेला होता. मात्र, काही महिन्यांनंतर मॉस्कोमधील भारतीय दूतावासाकडून कुटुंबाला माहिती मिळाली की, तो रशियन नागरिक म्हणून तेथील सैन्यात भरती झाला आहे. दू
तावासाने कुटुंबाला पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, हा मुद्दा रशियाच्या संरक्षण मंत्रालयासमोर उपस्थित करून त्याच्या सुटकेची विनंती करण्यात आली आहे. दूतावासाकडील कागदपत्रांनुसार, संबंधित तरुणाने स्वतःच्या इच्छेने भारतीय नागरिकत्व सोडले असून त्याच्याकडे रशियन पासपोर्ट आहे. रशियन अधिकाऱ्यांकडून उत्तर मिळाल्यानंतर पुढील माहिती दिली जाईल, असेही दूतावासाने कळवले आहे.
रशियात पोहोचल्यानंतर अवघ्या काही काळातच मुलाने नागरिकत्व बदलून सैन्यात भरती होण्यामागील परिस्थितीवर पित्याने गंभीर चिंता आणि संशय व्यक्त केला असून, केंद्र सरकारने हस्तक्षेप करून मुलाला परत आणावे, अशी मागणी केली आहे.






