पुणे जिल्हा | उत्रौलीतील महिलांनी अर्पण केला बप्पाच्या चरणी चांदीचा हार

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – उत्रौली (ता.भोर) येथील वेताळ फ्रेंड सर्कल गणेशोस्तव मंडळाच्या महिलांच्या हस्ते गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
नवसाला पावणारा अशी ओळख असणारा वेताळपेठचा राजाचे आगमन उत्साहात करण्यात आले. गेली ५ वर्षे महिलांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली जात आहे.
पावसाने उघडीप दिल्याने महिलांनी महाराष्ट्रीयन नऊवारी साडी,नाकात नथ,फेटे परिधान करून असा पारंपरिक साज करत गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोष केला.
ढोल- ताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजी करीत, महिलांनी फुगडी,फेर, पारंपरिक गीतं गात मोठ्या जल्लोषात लाडक्या बाप्पांचे वाजतगाजत आगमन झाले.
महिलांच्या हस्ते गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर महिलांनी आपल्या बचतीतून आवडत्या बप्पासाठी बनविलेल्या ३० तोळ्याचा चांदीचा हार अर्पण करण्यात आला.
मंडळातील ५७ महिलांनी एकत्र येत आपण ज्या प्रमाणे कोणत्याही कार्यक्रमात अलंकार परिधान करतो तसाच आपल्या बप्पासाठी महिलांनी आपल्या शिलकीतून गेले दोन वर्षे पैसे गोळा करून चांदीचा अलंकार बनविला आहे.
आपल्या एकीच्या बळावर कोणतेही गोष्ट सहज साध्य होते. हा आदर्श निर्माण करीत ग्रामीण भागातील महिलाही कशातही कमी नाहीत हे दाखवून दिले.
तसेच मंडळामार्फत विविध समाजोपयोगी कामे केली जातात. वर्षभरातील असणारे सण उत्साहात साजरे केले जातात. गणेश मंडळाचे अध्यक्ष विराज शेटे व खजिनदार अक्षय शेटे आहेत.





