पुणे जिल्हा | वीसगाव खोऱ्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यात आषाढी बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. विसगाव खोऱ्यातील धनावडे वाडी, वरवडी बुर्दुक, पळसोशी, नेरे, उत्रौली ,वरवडी खुर्द, कळकदरा,वरवडी डायमुख, पाटणे वाडी,
शेरताटी,कोळेवाडी,हातनोशी, बाजारवाडी, मानकरवाडी, पाले, धावडी, राऊतवाडी, पोळवाडी, फडतरवाडी, थोपटेवाडी, पांडवाडा,कान्हवडी, गोकवडी पळसोशी, आंबाडे खानापूर या परिसरात बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला. ढोलताशांच्या गजरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करीत शेतकऱ्यांनी बैलांच्या मिरवणुका काढल्या.
पाऊस गेले आठ दिवस समाधानकारक पडत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग उत्साहाने बैलपोळा साजरा करताना पहावयास मिळत आहे.शेतकरी बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती देतात. शेतकरी आपल्या बैंलांना जिवापाड जपतात,या सणाच वेगळे महत्व असल्याने प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरात मातीच्या दोन बैलांची पूजा करताना हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा करतात.
त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो, हीच पुरणपोळी नंतर बैलांना खायला दिली जाते. बैलांच्या वशींडापासूनचा पुढील भाग आणि मानेच्या वरचा भाग म्हणजे खांदा या भागाची खांदेमळणी केली जाते. बैलांचे खांदे गरम पाण्याने धुतले जातात. काऊ,तेल,बाजरीची भाकरी,हळिव याचा मलीदा तयार करून बैंलाना चारला जातो
बैलांना स्वच्छ धूवून (पोहणी) अंगावर छाप उठवितात, सजवून रंगीत झालर लावून, शिंग रंगवून, बेघड लावून सजवण्यात आले, डीजे,ढोल ताशांच्या तालात, फटाक्यांच्या आतीशबाजीत, गुलालाची उधळण करीत सायंकाळी गावातील बैलांची मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी सुवासिनींनी बैलांचे औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य भरविण्यात आला.
पायात तोडे,कपाळावर बाशिंग,गळ्यात घुंगराच्या माळा,चंगाऴ,बैलांची शिंगे घासून हिंगुळ लावून बेगड चिकटवले, फुगे बांधले,टोकावर शेंब्या,कपाळावर गोंडे ( धारक्या) दोन्ही शिंगामध्ये काळ्या दोऱ्याने गव्हाच्या कणकेचे बनवलेले कुडूंबळ,डाव्या बाजूच्या पुढील पायात दृष्ट लागू नये म्हणून काळा दोरा,लिंबू, अंगावर झुल,फूगे, रीबिन बांधले,
बाशिंगे लावली. माढूळी बांधली,म्होरकी आवळली,तोडे चढविले, कासरा ओढला,घुंगुरमाळा बांधल्या, वेसनी घातल्या,छमच्या गाठल्या,चवर ढाळली,शिक्के उठविले,झुली चढविल्या,पैंजण घातले, पट्टा आवळला, असा साज बैंलाना सजविले आहे. -दिलीप शेटे, प्रगतीशील शेतकरी, उत्रौली (ता.भोर)





