पुणे जिल्हा | शेडनेटमधून रसायनमुक्त दर्जेदार उत्पादन

वीसगाव खोरे, {दीपक येडवे} – आर्थिकदृष्ट्या न पडवणाऱ्या पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून विषमुक्त नैसर्गिक शेतीचे प्रणेते पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भोर तालुक्यातील वेळु येथील प्रयोगशील शेतकरी गुलाब महादेव घुले, प्रसाद गुलाब घुले या पिता- पुत्राने विषमुक्त नैसर्गिक शेती करू लागले. १० गुंठ्यांचे शेडनेट २०१६ मध्ये तयार करून घेतले. वर्षातून तीन पिके घेतली जातात.
पालेभाज्या, वेलवर्गीय फळभाज्या, स्टाॅबेरी २०१७ पासून विषमुक्त नैसर्गिक शेती शेडनेटमध्ये सुरू केली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सरी ओरब्यांवर दोन बाजूंनी झिकझॅक पद्धतीने ठिबक सिंचन भूमिगत केली.
रब्बी हंगामात सप्टेबंर महिन्यांच्या दुसऱ्या आठवड्यात टोकण पद्धतीने लागवड केली. गेल्या वर्षी बेड गादी वाफे दीड फूट उंची, १ फूट रुंदी, ड्रीप लाइन झिकझाॅक, दोन रोपांतील अंतर टोमॅटो अडीच फूट, काटे वांगी ३ फूट, काकडी दीड फूट, वेलीवरचा घेवडा एक फूट, दोडका तीन फुटांवर,
डफळ दोन फुटांवर दुधी भोपळा चार फुटावर टोकण पद्धतीने लागवड केली. ठिबक सिंचनाद्वारे आठवड्यातून दोन वेळा जिवामृताचा डोस दिला. आठवड्यातून एकदा जीवामृत, दशपर्णी अर्काची फवारणी केल्याने किड पूर्णपणे नियंत्रणात आली.
मजुरांवरील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी घरातील आजी वत्सला, वडील गुलाब, आई शिवगंगा, प्रसाद व त्यांची पत्नी हर्षदा असे पाचही शेतात राबतात. त्यामुळे मजुरांवर अवलंबून राहावे लागत नाही. लागवड, पिकाची बांधणी, खते, पाणी देणे, कीडरोग नियंत्रण अशी कामे केली जात असल्याने मजुरीचा खर्चही कमी होतो. ४० दिवसांनंतर दर्जेदार, सकस फळभाज्यांचे उत्पादन सुरू झाले. आठवड्यात बुधवारी, शनिवारी हातविक्री केली जाते.
अत्यल्प शेणखताचा वापर
आपल्या घरी असलेल्या देशी गाईंच्या शेणापासून तयार केलेले २५ किलो शेणखतातून १० गुंठे क्षेत्रावर केलेल्या लागवडीसाठी वापर केला. सर्व पिके टोकण पद्धतीने लागवड केल्याने ज्या ठिकाणी बीची लागवड करावयाची आहे, अशा ठिकाणी एक मुठभर शेणखत तेथील जमीनीत मिसळले त्यामुळे पीके जोमात आली. तण नियंत्रणात आले.
शेडनेटमधील उत्पादनाची गुणवत्ताही चांगली असल्याने काकडी, टोमॅटो, काटे वांगी, वेलीवरचा घेवडा, दोडका, डफळ, दुधी भोपळा या पिकांना वर्षभर ८० रुपये किलो दर मिळतो. पुणे शहरातील सोसायटीच्या परिसरात बुधवारी आणि शनिवारी ऑनलाइन पद्धतीने विक्री केली जाते. आठवड्याला स्वतः हातविक्री करतात. त्यामुळे व्यापाऱ्यांची मध्यस्थी टळून ग्राहकांना दर्जेदार, सकस, विषमुक्त भाजीपाला दिला जातो. – प्रसाद घुले, प्रयोगशील शेतकरी.
बांबुचा वापर न करता तारेचा झोका पद्धतीने वेलवर्गीय फळभाज्या संगोपन केले जाते असल्याने आर्थिक बचत होते. भूमिगत ठिबकद्वारे सिंचन केले जात असल्याने उन्हाळ्यात ठिबकचे पाइप प्रसरण होवून वाकडे तिकडे होऊन लवकर खराब होत नाहीत. किडीसाठी सूर्यफुल, मका, झेंडु सापळा पिके लावण्यात आली आहेत. त्यामुळे किड नियंत्रणात आली. – गुलाब घुले, प्रयोगशील शेतकरी.





