पुणे जिल्हा | बळीराजाची कन्येची गगनभरारी, स्नेहा झाली पीएसआय

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – कान्हवडी (ता.खंडाळा) गावची सुकन्या स्नेहा संजय चव्हाण यांची पीएसआयपदी निवड झाली आहे. प्रयोगशील शेतकरी संजय हनुमंत चव्हाण आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करीत असतात. आजोबा हनुमंत चव्हाण यांच्या बरोबर शेतीचे धडे घेत जिद्द, चिकाटी, सातत्याच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२२ मध्ये ६५० पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत २९० गुण मिळवत ६० वी रॅंक प्राप्त करून पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे.
७५० लोकसंख्या असणाऱ्या छोट्याशा गावातील एका शेतकऱ्याच्या मुलीने जिद्द, सातत्य,प्रयत्न, मेहनत, चिकाटीच्या जोरावर यश संपादन केल्याने संपूर्ण तालुक्यातून या शेतकऱ्याच्या मुलीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संजय चव्हाण आणि कुसुम चव्हाण हे कान्हवडी गावचे शेतकरी दांपत्य. त्यांना एक मुलगा व दोन मुली. त्यापैकी स्नेहा ही सर्वात मोठी. स्नेहा ही लहान पणापासून हुशार, जिद्दी, अभ्यासू , जिज्ञासू मुलगी आहे.गावातील प्रथम महिला पीएसआय होण्याचा मान मिळवला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत,माध्यमिक शिक्षण खानापूर येथील सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालयात तसेच महाविद्यालयीन शिक्षण भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयात झाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास कोणताही क्लास न लावता स्वयंअध्ययन पध्दतीने करत तयारी केली. परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून उत्तीर्ण झाल्याबद्दल कान्हवडी ग्रामस्थ व शक्तीमान सेवा मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करीत एकमेकांना पेढे भरवित आनंद साजरा केला.
आई, वडील यांच्या प्रेरणेतून आणि आई-वडिलांनी दाखविलेला विश्वास, शिक्षकांसह नातेवाईकांनी केलेले मार्गदर्शन आणि मित्र मैत्रीनींची साथ यामुळे मी हे यश संपादन करू शकले. पुढे परीक्षा देत क्लासवन होण्याचा मानस स्नेहा हिने व्यक्त केला.
लहानपणापासून स्नेहा हुशार आहे. तिला शिक्षणाची आवड होती. ती शासकीय सेवेत जाण्याचा हा विश्वास होता आणि तिने करून दाखविले. खूप आनंद होत आहे आणि खूप अभिमान वाटतोय.शेतीत केलेल्या कष्टाचे चीज झाले. – संजय चव्हाण, स्नेहाचे वडील




