पुणे जिल्हा | बाजारवाडी येथे जागवल्या राधा गायीच्या आठवणी

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – आजच्या काळात अशी अनेक उदाहरणं पहावयास मिळतात की मुल आपल्या आई वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी नकार देतात.
अंत्यविधीला उपस्थित राहत नाहीत. परंतु प्रगतशील शेतकरी धनंजय पोळ यांनी आपल्या राधा या गाईच्या आठवणी जागवल्या. तिचे वर्ष श्राद्ध थाटामाटात केले.
या गोमातेच निधन वर्षापूर्वी झाले. तिचे कुटुंबातील सदस्याप्रमाणे हिंदू धर्मातील सर्व धार्मिक विधी करण्यात आले.
बाजारवाडी (ता.भोर) येथील प्रगतिशील शेतकरी धनंजय रघुनाथ पोळ यांच्या घरातील गाईचा खिलार जातीची राधा ही गाय होती.
राधा गायीने घराचं नंदनवन केले.पोळ यांनी गायीची कृतज्ञता व्यक्त करत आयुष्यभराची साथ देणाऱ्या गायीचा शेवट गोड केलाय.
वासरु ते १० वर्षांच्या सहवासात राधा गाय ही पोळ कुटुंबाची सदस्य बनली. घरातील लहान थोरांची आवडती असणारी राधा हिचा मृत्यू झाला.
तिचा घरातील एक सदस्य गेल्याच्या भावनेतून तिचा दहावा ,तेरावा आणि आता प्रथम पुण्यस्मरण (वर्ष श्राद्ध) विधी थाटात करण्यात आला.
राधा या लाडक्या गायीचा माणसांप्रमाणे वर्ष श्राद्ध विधी केला. १० वर्षे मुलीप्रमाणे संभाळलेल्या राधा गायीचा मृत्यू झाला होता.
ज्या प्रमाणे माणूसाचा मृत्यू झाल्यानंतर ज्या पद्धतीने सेवा विधी पार पाडतात त्याच प्रमाणे राधा गायीच्या मृत्यूनंतर विधी पार पाडण्यात आला.
महिला सबलीकरणाच्या पुरस्कर्त्या, राष्ट्रीय कीर्तनकार नेहा भोसले साळेकर यांनी सुश्राव्य कीर्तनात गाईचं महत्त्व विशद करताना गाय आणि आईच फक्त निस्वार्थ प्रेम करू शकते. तसेच कीर्तनरूपी सेवा सुरू असताना उपस्थित महिलांना गहिवरून आले.
त्यांनी राधाची आठवण काढत अश्रू मोकळी वाट करून दिली. उपस्थित नागरिक शोक सागरात बुडाले. गायीची विधिवत पूजा करून, सुहासिनींनी औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. २१ गायींना पुरणपोळी चारण्यात आली.
गोपालकांचा सन्मान
तसेच खिलार जातीची गायी ज्यांच्याकडे आहे, अशा २१ शेतकऱ्यांना हरीपाठाची पुस्तके भेट देत टाॅवेल, टोपी, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. वर्ष श्राद्ध निमित्ताने संपूर्ण गावाला श्रीखंड पुरीचे गाव जेवण देण्यात आलं.
जेवणांना नंतर भजनाचा कार्यक्रम करण्यात आला. वर्षश्राध्दाच्या विधीसाठी सातारा, रायगड,पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी, नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित होते. परिसरात सध्या शेतकरी धनंजय पोळ आणि त्यांच्या राधा गायीच्या प्रेमाची चांगलीच चर्चा सुरू आहे.





