“…डोक्यात हवा गेली होती”; निलेश साबळेला राशीचक्रकार शरद उपाध्येंनी सुनावले खडेबोल

Sharad Upadhye On Nilesh Sable | ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात निलेश साबळे याने सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती. मात्र 10 वर्षे या कार्यक्रमात सूत्रसंचालन करणाऱ्या निलेशचा ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या नवा सीझनमध्ये पत्ता कट करण्यात आला आहे. निलेशच्या जागी अभिनेता अभिजीत खांडकेकर ‘चला हवा येऊ द्या’चा नवा होस्ट असेल असं म्हटलं जात आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी लिहिलेली फेसबूक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. शरद उपाध्ये यांना निलेशने शोमध्ये आमंत्रित केल्यानंतर त्यांना देण्यात आलेल्या वागणूकीबाबत त्यांनी ही या पोस्टमध्ये लिहिली आहे.
शरद उपाध्ये यांची पोस्ट
‘आदरणीय निलेशजी साबळे,
आपल्याला ‘हवा येऊ द्या’च्या दुसऱ्या पर्वातून डच्चू देऊन त्याजागी अभिजीत खांडकेकरला आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली. वाईट वाटले पण आश्चर्य नाही. मला तुम्ही एकदा बोलावले होते. त्याप्रमाणे मी ११ वाजता पोहोचलो. पण ३ वाजेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते पण एका-दोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत. मला रुम सोडू नका असे सांगितले होते.
निलेश तुम्ही इतर कलावंतांच्या रुममध्ये जाऊन गप्पा मारीत होतात पण माझ्या रुममध्ये डोकावलात ते थेट ४ वाजता. स्माइलही न देता स्टेजवर गेलात. इतरांचे शूटिंग खूप वेळ केलेत पण मला ६ वाजता बोलावून घाईघाईत १५ मिनिटांत सारे आटोपले. त्यावेळीही इतर कलावंत मध्ये-मध्ये बोलत होते. माझा सारा दिवस फुकट गेला. एडिटींग मध्येही माझी उत्तरे गाळलीत. बाहेर आपली भेट झाली तेव्हा वडिलांच्या नात्याने काही सल्ले दिले. पण, कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती.
दुसऱ्याच्या विषयाबद्दल आदर ठेवायचा असतो पण तुम्ही बेपर्वा होतात. त्याचवेळी मला वाटले की, अहंकार अतिवाईट. गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते. एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो. स्टेजवर तुम्ही साऱ्यांना आपलेसे केले नाही. आपले सादरीकरणही आकर्षक होत नव्हते. या साऱ्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनेलने बाहेर काढले. निलेशजी स्वभाव मनमिळाऊ असावा, साऱ्यांना सांभाळून घ्यावे मग सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल. अभिजीत खांडकेकर ही धुरा चांगली सांभाळतील. मला त्यांचा सहवास मिळाला आहे. आपण अनुभवी आहात, त्यांना मार्गदर्शन करा. इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा. आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती.’ सध्या शरद उपाध्य यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. Sharad Upadhye On Nilesh Sable |
‘चला हवा येऊ द्या २’ कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं, तर यंदा या शोमध्ये श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भरत गणेशपुरे यांच्यामध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे या नव्या नावाची भर पडली आहे. या पर्वात आणखीही काही लोकप्रिय कलाकार दिसणार असल्याचे समोर आले आहे. Sharad Upadhye On Nilesh Sable |
हेही वाचा:





