पुणे जिल्हा | पाझर तलावातील पाण्याने तळ गाठला

लोणी- धामणी (प्रतिनिधी) – सध्याच्या तीव्र उन्हाळ्यामुळे वडगावपीर (ता.आंबेगाव) येथील बैलगाडा घाटाजवळील पाझर तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. आठवडाभर पुरेल एवढेच पाणी या तळ्यात शिल्लक आहे. त्यामुळे या परिसरात थोड्याच दिवसात पाणी समस्या गंभीर बनणार आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वडगावपीर सह सहा गावांची कायमची दुष्काळग्रस्त म्हणून ओळख आहे. डिंबा धरणाचा उजवा कालवा याच परिसरातून जातो. मात्र, कालव्याच्या पाण्याचा कुठलाही उपयोग होत नसल्याने या परिसरात जानेवारीपासूनच दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे.
या वर्षी परिसरात एकदाच मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. या पावसाने येथील पाझर तलाव पाण्याने पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. तरीही तळ्याच बऱ्यापैकी पाणी साचले होते. पण सध्या वाढत्या उन्हाने तलावातील पाणी पातळी झपाट्याने घटल्याचे जनावरांचा व शेतीचा पाणी प्रश्न निर्माण झाला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
चालू वर्षी खरीप हंगामात पावसाने दांडी मारल्याने व रब्बीमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्याने पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला नाही. त्यामुळे मेंढ्या व जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा करावा, अशी या परिसरातील नागरिकांची खूप वर्षांपासूनची मागणी आहे. तसेच या परिसराला वरदान ठरणारा म्हाळसाकांत जलसिंचन उपसा सिंचन प्रकल्प अद्याप कागदावरच आहे. त्यामुळे भविष्यात तरी या परिसराचा दुषकाळग्रस्त हा शिक्का पुसणार का नाही, हा मात्र न उलगडणारा प्रश्न आहे.





