Satara : उत्तर कोरेगावचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडवणार

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या हक्काचे पाणी कोरेगाव तालुक्याला मिळवून देणार आहे. त्यासाठी वाटेल ती राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल. सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करणार आहे. कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग दुष्काळमुक्त करून ९८ टके क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी कृष्णा नदीवर वनगळ उपसा सिंचन योजना राबवण्यात येणार आहे. सुमारे अकराशे कोटी रुपयांची योजना दोन वर्षात कार्यान्वित करून बावीस हॉर्स पॉवरच्या पंपाच्या साह्याने बारमाही पाणी अरबवाड़ी तलावात आणण्यात येईल, अशी घोषणा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांनी केली.
अरबवाडी, ता. कोरेगाव येथे तलावामध्ये वसना उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी आणण्यात आले आहे. शनिवारी ना. महेश शिंदे यांच्यासह कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता नितीश पोतदार, उपविभागीय अभियंता शिवाजी पवार, जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संतोष जाधव विद्यमान अध्यक्ष निलेश यादव, एडवोकेट संजय सकुंडे, माजी पं.स.सदस्य विलास पवार, शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर, तालुका उपप्रमुख चंद्रकांत पवार, सरपंच शामराव कदम, सरपंच हेमंत नलवडे,संदीप भोसले, बबनराव भिलारे, ज्योती कोरडे, बाबा नलगे, तानाजी गोळे आदी उपस्थित होते.
ना.महेश शिंदे म्हणाले, आजपर्यंत सातारा जिल्ह्याचे हक्काचे पाणी शेजारच्या जिल्ह्यांनी पळवून नेले. तेव्हा लोक प्रतिनिधी असणारे शांत बसले होते.त्यांना संधी असून देखील त्यांनी कधीही आपल्या भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न केले नाहीत, केवळ दिखावा केला आणि राजकारण केले. राजकारणातून सता आणि सत्तेतून राजकारण या पलीकडे त्यांनी काहीच केले नाही.
मात्र बनवडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व सामान्य शेतकऱ्यांनी सामान्य शिक्षकाच्या पोराला आमदार केल्यानंतर शंभर टक्के या भागाचा पाणी प्रश्न सोडवण्याचा निर्धार केला होता, त्याचप्रमाणे आज पाणी योजना कार्यान्वित झाली आहे. तुम्हाला ही योजना पूर्ण झाल्याचे समाधान वाटत असेल, मला मात्र मनापासून समाधान वाटत नाही. कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग जोपर्यंत पूर्णपणे सिंचनाखाली येत नाही. तोपर्यंत समाधान वाटणार नाही, असे सुतोवाच केले.





