Bullock Cart Racing | राज्यातील ‘या’ जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी; नेमकं कारण काय?

अहिल्यानगर : जिल्ह्यात लंपी त्वचारोगाचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मागील तीन आठवड्यांत 29 जनावरांचा मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलत बैलगाडा शर्यती आणि जनावरांचे प्रदर्शन यांच्यावर बंदी घातली आहे.
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त उमेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत 668 लंपी रोगाची प्रकरणे नोंदवली गेली असून, सध्या 343 जनावरांवर उपचार सुरू आहेत. रोग नियंत्रणासाठी जिल्ह्यातील 94 टक्के जनावरांचे, म्हणजेच 9 लाख 51 हजार 400 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
लंपी रोगाचा सर्वाधिक फटका राहुरी, राहता, कोपरगाव आणि शेवगाव या चार तालुक्यांना बसला आहे. हा विषाणूजन्य आजार मच्छर, गोमाश्या यांसारख्या कीटकांद्वारे पसरतो, ज्यामुळे जनावरांना ताप, त्वचेवर गाठी, दूध उत्पादनात घट आणि गंभीर प्रकरणांत मृत्यू होतो.
या रोगाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रिंग लसीकरण, गोठ्यांचे निर्जंतुकीकरण आणि जैवसुरक्षा उपाय लागू केले आहेत. शेतकऱ्यांना संशयित प्रकरणे तातडीने 1962 या टोल-फ्री क्रमांकावर कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
लंपी रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. बैलगाडा शर्यती आणि साप्ताहिक जनावर बाजार बंद झाल्याने स्थानिक शेतकरी आणि आयोजकांवर परिणाम झाला आहे. यापूर्वी सांगली जिल्ह्यातही असाच निर्णय घेण्यात आला होता, आणि आता अहिल्यानगरातही हा उपाय प्रभावी ठरेल, अशी आशा आहे.





