सातारा : समाज माध्यमांच्या मोहजालात कमी किंमतीत चांगल्या वस्तु खरेदी करण्याचा मोह आर्थीक फटका देणारा ठरत आहे. परभणीमध्ये फायबरच्या बैलगाडीची ऑर्डर दिली गेली. प्रत्यक्षात मात्र, खात्यावर पैसे आल्यानंतर या विक्रेत्याने संबंधित खरेदीदाराला ब्लॉक करून हजारो रूपयांचा चुना लावला आहे. फसवणुकीचे हे प्रकार सर्रास होत असल्याने ऑनलाईन खरेदी म्हणजे लुटमारीचे जाळे वाटू लागले आहे. येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षिका स्वाती शरद चव्हाण यांनी समाज माध्यमावर एक बैलगाडीचा टेबल पाहिला. या टेबलची ऑर्डर देण्यासाठी त्यांनी व्हिडीओवर निर्देशित केलेल्या नंबरवर संपर्क साधला. त्यानंतर प्राथमिक बोलणे झाल्यानंतर ही गाडी खरेदी करण्याचा निर्णय झाला. पैसे आल्यानंतर लगेचच गाडी डिस्पॅच केली जाईल असा संवादही झाला. प्रत्यक्षात मात्र, पैसे दिल्यानंतर संबंधित व्यक्तीने या शिक्षिकेचा फोनही घेण्याचे टाळले आणि त्यांना ब्लॉक करून संपर्कात येेणेही टाळले. अशी घ्या काळज़ी समाज माध्यमांवर आवडलेल्या वस्तु घेण्यापूर्वी संबंधित वेबसाईटची खात्री करून घ्या. साधारण किती दिवसांपूर्वीपासून ही विक्री सुरू आहे याचा अंदाज घ्यावा. सीओडी अर्थात कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय अवलंबावा. असा पर्याय नसेल तर खरेदी टाळावी. ऑनलाईन खरेदीत हा मोह टाळा मोबाईलवर विविध समाजमाध्यमांवर एआयच्या माध्यमातून आपल्या आवडीनिवडीचा डेटा गोळा केला जातो. त्यातूनच आपल्याला मोहक वाटतील अशी उत्कृष्ट छायाचित्रे असलेल्या वस्त्ाुही नजरेस पडतात. ऑफलाईन महाग दिसणार्या किंमती ऑनलाईन स्वस्त दिसल्या की तो घेण्याचा मोह होतो. नेमके हेच हेरून ऑनलाईन फसवणुक केली जाते. त्यामुळे वस्तु स्वस्त मिळतात म्हणून त्या खरेदी करण्याचा मोह टाळणे गरजेचे आहे. महिला हिटलिस्टवर सायबर गुन्ह्यांमध्ये महिलांची आर्थीक फसवणुक होण्याची शक्यता सर्वाधिक असते. घरगुती वापराच्या वस्तु, सौंदर्यप्रसाधने, वस्त्र यांसह अनेक खरेदीचे पर्याय महिलांना खुणावत असतात. त्यांच्या खरेदीची रक्कमही कमी असल्याने याचे गुन्हे दाखल होत नाहीत. त्यामुळे सायबर गुन्हेगार कमी किंमतीत वस्तु विक्रीस उपलब्ध असल्याचे महिलांना अमिष दाखवतात, याला महिला बळी पडतात. स्मार्टफोनचा स्मार्ट वापर करण्याचे ज्ञान घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन खरेदी करताना आपण कोणती वेबसाईट सर्फ करतोय आणि ती खात्रीची आहे का याकडे लक्ष देणे गरजेचे असते. ऑनलाईन खरेदीसाठी खात्रीशीर आणि नोंदणीकृत वेबसाईटला प्राधान्य द्यावे. – जय गायकवाड, सायबरतज्ज्ञ