पुणे जिल्हा | हिंगेवस्ती येथे टोमॅटो वाहतूक करणारा टेम्पो उलटला

अवसरी, (वार्ताहर)- अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) हिंगेवस्ती येथे टोमॅटो वाहतूक करणारा रिकामा टेम्पो दगडी कठड्याला धडकून उलटल्याने टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कठड्याजवळ उभे असलेले मनोज हिंगे आणि माणिक हिंगे नशीब बलवत्तर म्हणून वाचले. टेम्पो मालक चालक रोहन नवले यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातून बेल्हा ते जेजुरी रस्ता जात असल्याने या भागातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला टेम्पो, जडवाहतूक करणारे ट्रक, पेट्रोल, डिझेल वाहतूक करणारे टँकर, सीएनजी गॅस वाहतूक करणारे टेम्पो अवसरी, जारकरवाडी लोणी मार्गे जेजुरीकडे येजा असते.
आयशर टेम्पो (एमएच 14 केए 3876) हा गुरुवारी रात्री 12.40च्या दरम्यान जेजुरीवरून टोमॅटो क्रेट खाली करून लांडेवाडीकडे घरी चालला होता. माणिक हिंगे आणि मनोज हिंगे हे चौरेवस्ती येथे मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम संपल्यानंतर हिंगे वस्तीजवळ असणार्या लाईटच्या उजेडात थांबले होते. त्यांच्यापासून दहा फूट अंतरावर जेजुरीवरून आलेला आयशर टेम्पो डिंभा उजव्याच्या चारीच्या दगडी कठड्याला जोरदार धडकला.
गावडेवाडी ते हिंगेवस्ती मुक्तादेवी मंदिर रस्त्याचे एक वर्षांपूर्वी तीन कोटी रुपये खर्च करून रुंदीकरण, खडीकरण तसेच डांबरीकरण करण्यात आल्याने या रस्त्याने ये जा करणारी वाहने सुसाट वेगाने धावतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने अवसरी बुद्रुक एसटी स्टँड, मांदळे हॉस्पिटल जवळ धोकादायक वळणावर तसेच हिंगे वस्ती पहाडदरा रस्त्यावर गतिरोधक दिशादर्शक फलक बसवावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे





