पुणे जिल्हा | मेंगडेवाडी येथे गणेश देवस्थानचा उद्या कलशारोहण सोहळा

अवसरी, (वार्ताहर) – मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे मंगळवार, दि. २५ रोजी अंगारकी चतुर्थी आणि सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सुवर्णकलशारोहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन गणेश देवस्थान ट्रस्ट मेंगडेवाडी यांनी केले आहे.
मेंगडेवाडी येथे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तसेच अंगारकी चतुर्थीनिमित्त कलशारोहण समारंभ आयोजित केला आहे. मंगळवारी सकाळी पहाटे श्रीची महापूजा, नऊ वाजता सुवर्ण कलश मिरवणूक, अकरा वाजता कलशारोहण समारंभ. बालब्रह्मचारी मठाधिपती महंत श्री दत्त गिरी महाराज (भीमाशंकर) यांच्या हस्ते कलशारोहण होणार आहे. त्यानंतर प्रसादाचे वाटप होणार आहे.
दुपारी एक वाजता सांज धारा भजन मंडळ अवसरी बुद्रुक आणि श्री गणेश कृपा प्रासादिक भजन मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी पाच वाजता हरिपाठ, सायंकाळी सहा वाजता ह.भ .प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे. रात्री साडेआठ वाजता श्री गणेश नवतरुण मंडळ मुंबई यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थापक सदस्य व सभासदांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे.
रात्री दहा वाजता महाआरती, साडेदहा वाजता अन्नप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या धार्मिक कार्यक्रमाचे परिसरातील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणेश नवतरुण मंडळ व गणेश देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मेंगडेवाडी यांनी केले आहे.





