पुणे जिल्हा | ड्रोनमुळे आंबेगावच्या पूर्व भागात नागरिक भीतीच्या छायेत

अवसरी, (वार्ताहर) – अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील वायाळ मळा फाटा आणि जारकरवाडी फाटा येथे रात्री बारा वाजता ड्रोनच्या घिरट्या सुरूच असल्याने नागरिक व रस्त्याने जाणारे दुचाकी वाहन चालक यांनी सांगितले आहे.
दोन दिवसांपूर्वी मंचर येथील खाजगी कंपनीतून बारा वाजता कामावरून घरी जाणारे चार पाच कामगार रस्त्याने जारकर वाडी आणि अवसरी बुद्रुक या ठिकाणी जात होते. हे कामगार रस्त्याने एका मागे एक चालले होते. वायाळ मळा फाटा येथे आले असताना अचानक डोक्यावर पन्नास शंभर फुटावर ड्रोन सोबत चालला असल्याचे त्या युवकांच्या लक्षात आले.
त्या नंतर ते सर्व एकत्र येऊन मोटासायकल बंद करून रस्त्यावर उभे राहिले. त्यानंतर तो ड्रोन वायाळ मळ्याच्या बाजूला निघून गेला. त्यामुळे ते युवक घाबरले. या अगोदरही मेंगडेवाडी आणि परिसरात ड्रोनच्या घिरट्या अनेक नागरिकांनी पाहिल्या होत्या आणि काहींनी पाठलाग सुध्दा केला, पण ड्रोन कोठून येतात हे सापडले नव्हते.
यातील काही युवक अवसरी बुद्रुक येथे वळले आणि बाकी जारकर वाडीमार्गे धामणी येथे जाणारे युवक पुढे निघाले. हे युवक जारकर वाडी येथे रस्त्याने जात असताना त्यांना पुन्हा ड्रोन घिरट्या घालताना दिसला.
त्यामुळे ते युवक घाबरून गेले. नक्की या मागे काय गौड बंगाल आहे, हे अजून कोणालाच समजले नाही. पारगाव पोलीस आणि मंचर पोलीस यांनी अशा वापर करणाऱ्या ड्रोन आणि मालक यांच्यावर निर्बंध आणावेत, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांनी केली आहे.
ड्रोनचा कोणी गैरवापर करत आहे का ? या ड्रोनचा अजून कोणत्या दुसऱ्या कामासाठी तर वापर करत नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे. जाणून बुजून नागरिकांना घाबरवण्यासाठी ड्रोनचा वापर तर केला जात नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे. चोरटे तर ड्रोनचा वापर करत नाही ना अशी शंका सुधा आता नागरिक घेउ लागले आहेत.





