पुणे जिल्हा | वंडर किड्स स्कूलच्या वतीने पालखी सोहळा साजरा

अवसरी, (वार्ताहर) – अवसरी खुर्द येथील वंडर किड्स स्कूल येथे आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा उत्साहात पार पडला. लहान मुलांना पालखी सोहळा म्हणजे काय, वारीचे कार्य कसे असते याची माहिती व्हावी, या साठी पालखी सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती मुख्याध्यापिका शुभांगी लिंगे यांनी दिली.
अभंग मळा येथील वंडर किड्स स्कूलच्या वतीने पालखी सोहळा उत्साहात पार पडला. पालखी अवसरी खुर्द गावातली प्रदक्षिणा मार्गाने भैरवनाथ मंदिर चौकात आली. शिक्षणाचे महत्त्व सांगणारे फलक मुलांनी हातात धरले होते. या ठिकाणी मुलांनी गोल रिंगण केले.
स्कूलचे अध्यक्ष योगेश लिंगे, पोलीस पाटील संतोष शिंदे, मयूर पतसंस्थेचे अध्यक्ष हरिदास रामवत, समाजसेवक नवनाथ वाघ यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी वारकरी संप्रदायाचे हभप अनंत टेंबेकर, संतोष कसाब व मालन कसाब यांनी अभंग गायले.
स्कूलमधल्या चिमुकल्यांनीही काही अभंग गायले. अग्रभागी असलेल्या लहान मुलांनी विठ्ठल- रुक्मिणी ,संत ज्ञानेश्वर, जनाबाई ,संत तुकाराम यांची केलेली वेशभूषा आकर्षनाचे केंद्रबिंदू ठरली. बाल चमूंनी खेळलेल्या फुगड्या पाहून उपस्थित सर्व विठ्ठल भक्त मंत्रमुग्ध झाले. ज्ञानोबा, तुकाराम जयघोषाने परिसर दुमदुमला.
दिंडीचे आयोजन स्कूलच्या मुख्याध्यापिका शुभांगी लिंगे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका पुनम खेडकर,पायल काळे, सुरेखा शिंदे, तेजल शिंदे, प्रणाली अभंग यांनी केले.





