पुणे जिल्हा | अवसरीच्या कुंभारवाड्यात बैलपोळ्याच्या तयारीची लगबग

अवसरी, (वार्ताहर) – आंबेगाव तालुक्यातील अनेक गावामधील भाद्रपदी बैलपोळा अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. त्यामुळे कुंभारवाड्यात बैलपोळ्याला पुजेचा मान असलेल्या मातीचे बैल बनविण्याच्या कामांना वेग आला आहे.
तालुक्याच्या मंचर,अवसरी बुद्रुक, पारगाव, लोणी, कळंब, धामणी येथील व्यावसायिकांनी बनविलेल्या मातीच्या आकर्षक बैलांना परिसरातील वाडी वस्ती तसेच ग्रामीण भागाबरोबर पुणे, ठाणे व मुंबई शहरातून मागणी वाढली आहे. भाद्रपदी बैलपोळा अवघ्या तीन दिवसावर आला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतीसाठी बैलांएैवजी ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने शेतकऱ्यांच्या घरासमोर दिसणाऱ्या बैलजोड्या दिसेनासे झाल्या आहेत. बैलपोळ्याला पुजेसाठी वापरण्यात येणारे मातीचे बैल बनविण्याच्या कामाला गावो गावच्या कुंभारवाड्यामध्ये वेग आला आहे.
अवसरी बुद्रुक येथील साहेबराव काळे यांनी वेगवेगळ्या आकारातील सुमारे सात ते आठ हजार मातीचे बैलजोड्या बनविल्या आहेत. त्यांनी बनवलेल्या आकर्षक बैलजोड्यांना आसपासच्या गाव बरोबर पुणे,भोसरी या शहरी भागातूनही मागणी वाढली आहे. बैलजोडीच्या किमती ५० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत असल्याचे साहेबराव काळे यांनी सांगितले.





