अवसरी, (वार्ताहर) – गायमुख (ता.आंबेगाव) येथे गेल्या वर्षी झालेल्या पुणे नाशिक महामार्गावर पुणे बाजूकडून मंचरकडे रस्ता ओलांडताना, त्याच वेळी नारायणगाव बाजूकडून अती वेगात येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणून या ठिकाणी उड्डाण पूल उभारावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या बाय पास मार्गावर वर्षभरात शेकडो प्रवाशांना जीव गमावावा लागला आहे. आणखी किती प्रवाशांचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक तसेच चालक आणि प्रवाशांनी उपस्थित केला आहे. अवसरी तांबडेमळा हद्दीत भोरवाडी परिसरात नवीन पुणे नाशिक बायपास रस्ता जातो. भोरवाडी, गायमुख, शेवाळवाडी, निघोटवाडी मार्गे जीवन हॉटेलसमोर निघतो. भोरवाडीचा पूल पास केल्यानंतर अवसरी फाटा मार्गे अवसरी, गावडेवाडी, अवसरी मार्गे शिरूर, शिक्रापूर, रांजणगावकडे जावे लागते. तर सरळ गेले तर मंचर शहराकडे जाता येते. त्यामुळे पूल ओलांडून आल्यानंतर मंचरकडे वळण्यासाठी आणि मंचरकडून बायपासला प्रवेश करण्यासाठी जागा ठेवली आहे. त्याच बरोबर बायपासवरून नारायणगावकडून येऊन अवसरी मार्गे पूर्व भागात जायचे असेल तर या ठिकाणी डावीकडे वळण दिले आहे. या भागात स्पीड ब्रेकर आहे. परंतु हा स्पीड ब्रेकर क्रॉस केल्यानंतर वाहने वेगात पुढे निघतात. त्यानंतर बायपासमधून बाहेर अथवा बायपासमध्ये आत येण्यास रस्ता दिला असल्याने पुणे बाजूकडून मंचरकडे वळणारी वाहने रस्ता क्रॉस करत असतात. नारायणगाव बाजूकडून येताना उतार असल्याने वाहने वेगात असतात. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. नारायणगाव बाजूकडे येणाऱ्या वाहनांचा वेग कमी व्हावा यासाठी स्पीड ब्रेकर आहे. परंतु त्या नंतर अंदाजे शंभर फूट अंतरावर मंचरकडे वळणारी वाहने रस्ता क्रॉस करत असतात. त्यामुळे या भागात अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे पहिल्या स्पीड ब्रेकरनंतर त्याच्यापुढे पन्नास एक फूट अंतरानंतर दुसरा ब्रेकर असायला हवा. त्यामुळे वाहनांचा वेग कमी होईल वाहने थांबतील. दोन्ही बाजू कडून मंचरकडे वळणाऱ्या वाहनांना रस्ता क्रॉस करणे सोयीचे होईल. नारायणगावकडून पुणे बाजूस जाताना उतार आहे. स्पीड ब्रेकर पास केल्यानंतर वाहने पुन्हा वेग घेतात त्याच वेळेस मंचरकडे व जाणारी वाहने रस्ता क्रॉस करत असताना वाहनांना वेगाचा अंदाज न आल्यास अपघात होऊ शकतो त्यामुळे स्थानिक नागरिक, वाहनचालक, तांबडे मळा, भोरवाडी ग्रामस्थ यांनी केली आहे. लवकर उपाययोजना करावी पुणे नाशिक महामार्गावर नवीन बायपास हायवे सुरू होऊन एक वर्ष झाले आहे. पेठ, चिमणवाडी (इनाम वस्ती), भोरवाडी, गायमुख, कळंब हा परिसर अपघातग्रस्त तयार झाला आहे. वर्षभरात या परिसरात शकडो अपघात झाले आहेत. टू व्हीलर, चारचाकी तसेच मालवाहू वाहने यांचे अनेक अपघात झाले आहेत आणि अजून ही घडत आहे. यावर लवकरात लवकर उपाय योजना करावी. सिग्नलही हवा… गायमुख येथे मंचरसाठी वाहने बाहेर जाण्यासाठी तसेच बाय पास रस्त्यावर येण्यासाठी जागा आहे. सध्या तरी याच ठिकाणावरून तांबडे मळा ग्रामस्थ नागरिक ये जा करत आहे. या भागातील सर्व्हिस रस्ता अजून सुरू झाला नाही. त्या मुळे या भागात वाहतूक कोंडी पण मोठ्या प्रमाणावर होत असते. या ठिकाणी सिग्नल लावल्यास बेशिस्त वाहन चालकांना आळा बसेल. समस्या कमी करायची असेल तर या भागात उड्डाण पूल लवकरात लवकर करावा.