पिंपरी | आमदार आण्णा बनसोडेंच्या उमेदवारीवर टांगती तलवार

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी विधानसभा मतदार संघातून अजित पवार पक्षाकडून निवडणूक लढविणार्या इच्छुकांची संख्या व आमदार बनसोडे यांचे प्रकृतीस्वास्थ्य तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या तक्रारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत गेल्या आहेत.
इच्छुकांचा कार्यअहवाल पाठविण्याची जबाबदारी शहराध्यक्ष योगेश बहल यांच्यावर पक्षाने सोपविली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार आण्णा बनसोडे यांच्या पिंपरी विधासनसभा मतदार संघातील उमेदवारीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
येत्या दोन दिवसांत या मतदार संघातील उमेदवाराचे नाव जाहीर केले जाणार असल्याने, या मतदार संघातील उमेदवारीबाबत सस्पेन्स वाढला आहे.
विद्यमान आमदाराला मतदार संघ सोडण्याच्या धोरणामुळे महायुतीच्या जागा वाटपात पिंपरी विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वाट्याला आला आहे.
तर महाविकास आघाडीचा या मतदार संघातील उमेदवार ठरल्याने महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये कमालीची नाराजी आहे.
त्यांनी महायुतीकडून उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान, पिंपरी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनेकांना त्यांची भेट घेता येत नाही.
तर महापालिकेच्या अनेक वॉर्डात विकासकामे करताना आमदार बनसोडे हे राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याच्या काही तक्रारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहचल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी आज (दि.22) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरीतील इच्छुकांची संख्या पाहता, यामध्ये सुशिक्षित इच्चुकांची संख्या वाढली आहे. उमेदवारीसाठी या सर्वांनी राष्ट्रवादीत प्रवेशाची तयारी दर्शविली अहे.
त्यामुळे या सर्व इच्छुकांचा अहवाल शहराध्यक्षा योगेश बहल हे पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर सादर करणार आहेत. येत्या दोन दिवसांत या मतदार संघातील उमेदवाराच्या नावावर शिककामोर्तब होणार असल्याची माहिती बहल यांनी दिली.





