Saswad : भूसंपादन मोबदल्याचा वाद चिघळला
Saswad : पुरंदर तालुक्यातील पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी, कुंभारवळण आणि वनपुरी या गावांमधील जमिनींचे विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू आहे.

सासवड : पुरंदरच्या प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेत आणि मोबदला वाटपात मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. मोबदला वाटपाच्या प्रक्रियेत मध्यस्थांचा हस्तक्षेप, जाणीवपूर्वक वाद निर्माण करून शेतकऱ्यांची अडवणूक आणि आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सक्षम यंत्रणेमार्फत निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी सासवड येथील प्रांत कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येणार आहे.
पुरंदर तालुक्यातील पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी, कुंभारवळण आणि वनपुरी या गावांमधील जमिनींचे विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू आहे. शासनाकडून बाधित शेतकऱ्यांना एकरी सुमारे १ कोटी ६१ लाख रुपयांचा मोबदला जाहीर करण्यात आला असून, संमती दिलेल्या शेतकऱ्यांना मोबदला वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. महसूल विभागाच्या कार्यालयात वारंवार चकरा मारूनही प्रश्न सुटत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तडजोडीची तयारी असतानाही प्रकरणे लांबवली जात असून, शेतकऱ्यांचा हक्काचा मोबदला अडवला जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
६ नोव्हेंबरच्या आंदोलनात मोठ्या संख्येने बाधित शेतकरी सहभागी होणार असल्याचा दावा शामकांत ऊर्फ सुभाष भिंताडे, रघुनाथ कृष्णाजी कामठे, लता रघुनाथ कामठे, लक्ष्मण बाळासाहेब झुरंगे आणि मयूर फडतरे यांनी केला आहे. त्यामुळे विमानतळ भूसंपादनाचा प्रश्न पुन्हा एकदा प्रशासन आणि शासनाच्या पातळीवर चर्चेत येण्याची शक्यता आहे.
आमदार नारायण पाटील यांच्याकडे धाव
बाधित शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. पाटील यांनी पुरंदर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे (प्रांत) सन २०२३ ते २०२६ या कालावधीत दाखल झालेल्या सर्व अपील प्रकरणांची माहिती मागवली आहे. यामध्ये अपील प्रकरणांची सद्यस्थिती, निकाली काढलेल्या प्रकरणांचे आदेश, विमानतळबाधित गावनिहाय मोबदला वाटप यादी, निवाड्यांच्या प्रती, तसेच प्राप्त तक्रारी आणि त्यावर प्रशासनाने केलेल्या कारवाईचा सविस्तर तपशील मागवण्यात आला आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष शामकांत भिंताडे यांनी दिली.





