Bhor : भाटघर धरणक्षेत्रातील विद्युत पोल, डीपी हटविण्याची मागणी
Bhor : जगदाळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, बसरापूर गावच्या हद्दीत भाटघर धरणाच्या पाण्यात विजेचे खांब व रोहित्र उभारण्यात आले आहेत.

महुडे : भाटघर (ता. भोर) धरणाच्या पाण्याच्या पातळीलगत तसेच बुडीत क्षेत्राच्या सीमेवर बेकायदेशीरपणे अतिक्रमणे करून पक्की व कच्ची बांधकामे, हॉटेल्स आणि रिसॉर्टस उभारण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जगदाळे यांनी केला. बसरापूर येथे धरणाच्या पाण्यात विजेचे खांब (पोल) व डीपी उभारून वीजजोडणी करण्यात आल्याने नागरिकांसह पाळीव जनावरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. अशा आशयाचे निवेदन शिंद-भोलावडे गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जगदाळे यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व महावितरण विभाग यांना दिले आहे. या अतिक्रमणाची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी उपविभागीय अधिकारी, भोर यांच्याकडे केली आहे.
जगदाळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, बसरापूर गावच्या हद्दीत भाटघर धरणाच्या पाण्यात विजेचे खांब व रोहित्र उभारण्यात आले आहेत. धरणातील पाण्याची पातळी वाढल्यानंतर विजेचा प्रवाह पाण्यात उतरल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली. याबाबत तक्रारी करूनही महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
धरणाच्या दोन्ही भागातील बाजूंच्या रस्त्यालगत नदीकिनारी भूतोंडे खोऱ्यातील करंदी, कांबरे, वाढाणे, कुरूंजी, लव्हेरी, मळे, माजगाव, हर्णस, न-हे, ब्राम्हणघर, तसेच वेळवंड खोऱ्यातील पांगारी, पसुरे, राजघर, वेळवंड, म्हाळवडी, कर्नवडी, बारे खुर्द बुद्रुक, बसरापूर, भाटघर परिसरात धरणाच्या पाण्यात अतिक्रमण करून कच्ची-पक्की बांधकामे करण्यात आली आहेत. या ठिकाणी अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स बेकायदा उभारण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
पर्यावरण आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
या अतिक्रमणांमुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर, पर्यावरणावर आणि परिसरातील वन्यजीवांवर परिणाम होण्याची शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. पाण्याची पातळी वाढल्यानंतर विजेच्या खांबामुळे नागरिक, जनावरे आणि जलचरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जलसंपदा विभाग आणि महावितरणच्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
ठेकेदाराला ज्यावेळेस काम दिले त्यावेळेस पाण्याची पातळी खालावली होती. पाणी गाळात गेले होते. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला पाण्याची हद्द निदर्शनास आली नाही. संबंधित ठेकेदाराने पाणी खाली असताना पाण्याच्या कडेने लाईन नेली. परंतु, धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पोल पाण्यात गेले. पाण्याची पातळी कमी होताच तात्काळ संबंधित ठेकेदार पोल व डिपी दुसरीकडे स्थलांतरित करणार आहेत. तशा त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
-के.एस.लोहार, शाखा अभियंता, महावितरण.





