Shirur : शेतकऱ्यांना साडेसहा कोटींहून अधिक कर्जपुरवठा; सभासदांना यंदा ९ लाख ३८ हजारांचा लाभांश वाटप
Shirur : संस्थेचे एकूण भाग भांडवल ७० लाख ९० हजार ५५० रुपये आहे. संस्थेने विविध आर्थिक गुंतवणुकीच्या माध्यमातून आपली आर्थिक बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

न्हावरे : शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याबरोबरच सहकार क्षेत्रात आर्थिक शिस्त आणि विश्वासार्हतेचा आदर्श निर्माण करण्याच्या दृष्टीने शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संस्थेच्या आर्थिक ताळेबंदातून ही प्रगती अधोरेखित झाली असून, ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेने यावर्षी १७ लाख ११ हजार ९६६ रुपयांचा नफा नोंदविला आहे. तर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत संस्थेचा एकुण नफा ५५ लाख ६ हजार ५०५ रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सभासदांना वितरित करण्यात आलेल्या लाभांशातही वाढ झाली आहे.
संस्थेचे एकूण भाग भांडवल ७० लाख ९० हजार ५५० रुपये आहे. संस्थेने विविध आर्थिक गुंतवणुकीच्या माध्यमातून आपली आर्थिक बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये बँक भाग भांडवलामध्ये ३० लाख ४५ हजार ४०० रुपये, एनआरडी बँक गुंतवणुक ४ लाख ४० हजार २३० रुपये, बॉण्ड खरेदीमध्ये १० लाख रुपये, तर इमारत निधीमध्ये १० लाख २ हजार ३९० रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी साडेसहा कोटींहून अधिक कर्जपुरवठा
ग्रामीण भागातील शेती अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात सहकारी सोसायट्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. शिंदोडी सोसायटीनेही सभासद शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विविध प्रकारच्या कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. संस्थेच्या आकडेवारीनुसार, पीक कर्जापोटी ४ कोटी ४६ लाख ७९ हजार २३४ रुपये, मध्यम मुदत कर्जापोटी १ कोटी ५२ लाख ४४ हजार ४९८ रुपये, उपसा जलसिंचन कर्जापोटी १६ लाख ९७ हजार ६०० रुपये, तर ठिबक सिंचन कर्जापोटी ८ लाख २२ हजार २०० रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
याशिवाय वाहन खरेदीसाठी ४३ लाख १५ हजार ७१५ रुपये आणि ट्रॅक्टर खरेदीसाठी १३ लाख ७१४ रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. त्यामुळे पीक उत्पादनापासून ते शेतीच्या आधुनिकीकरणापर्यंत विविध गरजांसाठी संस्थेच्या माध्यमातून सभासदांना आर्थिक पाठबळ मिळत असल्याचे चित्र आहे.
लाभांश वाटपात वाढ; सभासदांना आर्थिक परतावा…
संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा लाभ सभासदांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने लाभांश वाटपही महत्त्वाचे ठरले आहे. मागील वर्षी सभासदांना ८ लाख ६३ हजार ९६९ रुपयांचा लाभांश वितरित करण्यात आला होता. यंदा ही रक्कम वाढून ९ लाख ३८ हजार ८५ रुपये झाली आहे. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत ७४ हजार ११६ रुपयांची वाढ झाली आहे.
सहकारातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ…
शेतीसाठी लागणारे भांडवल, सिंचन सुविधा, आधुनिक यंत्रसामग्री आणि इतर आर्थिक गरजांसाठी शेतकऱ्यांना अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या सहकारी संस्थांकडून मिळणारे कर्ज आणि आर्थिक सहकार्य शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरते. शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने कर्जपुरवठा, गुंतवणूक आणि लाभांश वाटप या तिन्ही आघाड्यांवर केलेली कामगिरी संस्थेच्या आर्थिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
एकीकडे शेती क्षेत्र विविध नैसर्गिक आणि आर्थिक संकटांना सामोरे जात असताना दुसरीकडे सहकारी संस्थांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम राहून सभासदांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर शिंदोडी सोसायटीच्या आर्थिक ताळेबंदातील आकडेवारी लक्षवेधी ठरत असून, संस्थेची ही आर्थिक प्रगती आगामी काळातही कायम राहणार का, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
गेल्या दहा वर्षांपूर्वी तोट्यात असलेली सहकारी संस्था माजी अध्यक्ष एकनाथ वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व संचालकांनी सभासदांच्या सहकार्याने नफ्यात आणली. त्यानंतर मागील वर्षी सन २०२५ मध्ये दिवाळीनिमित्त सभासदांना भागभांडवलाच्या १५ टक्के लाभांशाचे वाटप केले. त्याचप्रमाणे यावर्षीही आम्ही भागभांडवलाच्या १५ टक्के लाभांशासह साखरेचे वाटप करणार आहोत.
शिवाजी ओव्हाळ (अध्यक्ष) शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी
शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या कोरोना सारखी महामारी किंवा दुष्काळ सदृश परिस्थितीत शेतमालाचे नुकसान होऊ नये यासाठी जागा विकत घेऊन भविष्यात शेतकऱ्यांसाठी मोठे शीतगृह किंवा गोडाऊन उभारण्याचा आमचा मानस आहे. तसेच संस्थेच्या माध्यमातुन सभासद शेतकऱ्यांना वेगवेगळे व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याचाही आम्ही प्रयत्न करु
एकनाथ वाळुंज (माजी अध्यक्ष)
शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी





