Pune District : दुष्काळाचे सावट, तरी दसऱ्याचा उत्साह कायम!
Pune District : दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी घरोघरी तसेच दुकाने आणि वाहनांची पूजा केली जाते. घरांना, दुकानांना आणि वाहनांना झेंडूच्या फुलांची तोरणे बांधण्याची परंपरा असल्याने या सणाला फुलांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमेश्वरनगर परिसरात झेंडूच्या फुलांना मागणी वाढली आहे.

सोमेश्वरनगर : एकीकडे दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट, तर दुसरीकडे दसरा सणाचा उत्साह… अशा वातावरणात सोमेश्वरनगरच्या बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत रस्त्याच्या कडेला फुलांची दुकाने थाटण्यात आली असून, फुले खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यंदा झेंडूच्या फुलांचा दर १०० रुपये किलो असल्याने फुलांचे हे ‘पिवळे सोने’ चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, या दराचा खरा फायदा शेतकऱ्यांना होतोय की व्यापाऱ्यांना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी घरोघरी तसेच दुकाने आणि वाहनांची पूजा केली जाते. घरांना, दुकानांना आणि वाहनांना झेंडूच्या फुलांची तोरणे बांधण्याची परंपरा असल्याने या सणाला फुलांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमेश्वरनगर परिसरात झेंडूच्या फुलांना मागणी वाढली आहे. सकाळपासूनच नागरिकांची फुले खरेदी करण्यासाठी लगबग सुरू असून, बाजारपेठेत दसऱ्याच्या खरेदीची धामधूम दिसून येत आहे. झेंडूच्या फुलांचा दर किलोमागे १०० रुपये असतानाही नागरिकांकडून खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. फुलांच्या खरेदी-विक्रीमुळे बाजारपेठेत सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांच्या पदरी किती फायदा?
परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असतानाही नागरिक दसरा सण उत्साहात साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, झेंडूच्या फुलांना मिळणारा १०० रुपये किलोचा दर पाहता, त्यातून प्रत्यक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात किती पैसे पडतात आणि व्यापाऱ्यांना किती नफा मिळतो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्पादन खर्च, वाहतूक आणि विक्रीतील खर्च वजा जाता शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पन्न मिळते का, याकडे लक्ष वेधले जात आहे. एकीकडे दसऱ्याचा उत्साह आणि दुसरीकडे दुष्काळाचे सावट, अशा परिस्थितीत सोमेश्वरनगरच्या बाजारपेठेत झेंडूच्या फुलांनी रंगत आणली आहे. मात्र, ‘पिवळ्या सोन्याचा’ दर १०० रुपये किलो; शेतकऱ्यांच्या पदरी लाभ की व्यापाऱ्यांची चांदी? हा प्रश्न यंदाच्या दसऱ्यानिमित्त चर्चेत आला आहे.





