Pune District : आंबेगाव तालुक्याच्या अनेक गावांत २४ तास अंधार
Pune District : महावितरणकडून सर्वांना माहितीस्तव असे सांगण्यात आले आहे की, ३३ केव्ही घोडेगाव फिडर नारायणगाव ते घोडेगाव दरम्यान फॉल्टी झाला असून त्याच्या देखभाल/दुरूस्तीचे काम सुरू असून लाईन सुरळीत होण्यासाठी अंदाजे दोन ते तीन तास लागतील.

रांजणी : महावितरणच्या नावानं चांगभलं म्हणण्याची वेळ आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांवर आली असून ऐन नवरात्रौत्सवाच्या काळात वीजपुरवठा पूर्णपणे कोलमडला आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र अशा २४ तासात चार-चार वेळा आणि चार-चार तास बत्तीगुल होत असल्याने या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नवरात्रौत्सवाच्या कार्यक्रमांचा तर पार बट्ट्याबोळ झाला आहे. अशा कारभारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
महावितरणकडून सर्वांना माहितीस्तव असे सांगण्यात आले आहे की, ३३ केव्ही घोडेगाव फिडर नारायणगाव ते घोडेगाव दरम्यान फॉल्टी झाला असून त्याच्या देखभाल/दुरूस्तीचे काम सुरू असून लाईन सुरळीत होण्यासाठी अंदाजे दोन ते तीन तास लागतील. लाईन सुरळीत होताच वीजपुरवठा पूर्ववत केला जाईल. होणाऱ्या गैरसोयीबद्दल महावितरण दिलगिरी व्यक्त करत आहे. मात्र महावितरणच्या या नेहमीच्या दिलगिरी व्यक्त करणाऱ्या मेसेजमुळे ग्राहकांच्या संतापात कोणतीही घट झालेली नसून उलट संताप अधिकच वाढला आहे.
या फिडरमध्ये सातत्याने बिघाड होण्यामागे अत्यंत थर्डक्लास क्वालिटीचे मटेरियल वापरण्यात आल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या लाईनसाठी निकृष्ट दर्जाचे केबल, पोल आणि इतर साहित्य वापरण्यात आल्याने वाऱ्याची छोटीशी झुळूक आली किंवा पावसाचा थेंब पडला तरी हा फिडर कोसळतो आणि संपूर्ण पट्टा अंधारात बुडतो. या निकृष्ट कामाला संबंधित ठेकेदार आणि त्या ठेकेदारांकडून टक्केवारी घेऊन त्याच्या कामाकडे डोळेझाक करणारे काही लोकप्रतिनिधी आणि पुढारीगिरी करणारे स्वयंघोषित नेते जबाबदार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
नियमित आणि वेळेवर वीजबिल भरणारा सामान्य ग्राहक मात्र येथे भरडला जात असून त्याच्या वाट्याला फक्त अंधार आणि नेहमीसारखे गुळगुळीत उत्तर देणारा दिलगिरीचा मेसेज येत आहे. ऐन नवरात्रौत्सवात देवीच्या आरत्या, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना अचानक वीज गायब होत असल्याने भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. लहान मुलांचा अभ्यास, महिलांची स्वयंपाकपाण्याची कामे आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य या सर्वांवर वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा विपरीत परिणाम होत आहे.
टक्केवारीखोरांची नावे जाहीर करण्याची मागणी
केवळ दिलगिरी व्यक्त करून महावितरणची जबाबदारी संपत नसून या फिडरचे काम करणाऱ्या ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकावे आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या टक्केवारीखोर नेत्यांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अंधाराच्या खेळाला तात्काळ थांबवून सुरळीत वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा संतप्त जनतेचा उद्रेक काय असतो हे महावितरणला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.





