Pune District : दसऱ्याच्या झेंडूला कवडीमोल भाव
Pune District : दसरा सणात झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असून, घरोघरी तोरणे बांधण्यासाठी, सजावटीसाठी तसेच देवपूजेसाठी फुलांची खरेदी केली जाते.

आंबेगावातील शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी
मंचर : मंगळवार, दि.२० रोजी होणाऱ्या दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळेल, या आशेने बाजारपेठेत फुले विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. मंचर बाजारपेठेत सोमवार दि.१९ रोजी झेंडूच्या फुलांची आवक वाढल्याने प्रतवारीनुसार प्रतिकिलो ४० ते ७० रुपये दर मिळत आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे किमान १२० रुपये प्रतिकिलो भाव मिळेल, असा अंदाज उत्पादकांनी व्यक्त केला होता. मात्र, बाजारातील परिस्थितीमुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
दसरा सणात झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असून, घरोघरी तोरणे बांधण्यासाठी, सजावटीसाठी तसेच देवपूजेसाठी फुलांची खरेदी केली जाते. त्यामुळे सणाच्या काळात मागणी वाढून बाजारभाव सुधारतील, अशी उत्पादकांना अपेक्षा होती. यंदा दुष्काळी परिस्थितीचा फटका पिकांना बसला असून, उत्पादनावरही परिणाम झाला आहे. तरीही झेंडूला समाधानकारक भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. झेंडूची लागवड, खते, औषधे, मजुरी, फुलांची तोडणी आणि बाजारपेठेपर्यंत वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागतो. त्यातच कमी दर मिळत असल्याने खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ घालणे कठीण झाले आहे. सणासुदीच्या काळातही अपेक्षित आर्थिक फायदा होत नसल्याने झेंडू उत्पादक शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.





