Wagholi : वाघोलीवर पाणीटंचाईचे संकट
Wagholi : पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी उपलब्ध पर्यायांवर चर्चा करून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. नदीत पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाकडे पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.

वाघोली : भीमा नदीची पातळी खालावल्याने वढू खुर्द येथील बंधार्यातून वाघोलीला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे वाघोलीकरांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले असून, पर्यायी व्यवस्था सुरू करण्यासाठी पुणे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. ही व्यवस्था कार्यान्वित होण्यासाठी पाच ते सहा दिवस लागू शकतात. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगरसेवक रामभाऊ दाभाडे यांनी केले आहे.
वढू खुर्द येथील भीमा नदीवरील बंधार्यातील पाणीसाठा संपल्याने वाघोलीला पाणीपुरवठा करणार्या जॅकवेलमध्ये पाणी येत नाही. परिणामी, पाणीपुरवठा यंत्रणा प्रभावित झाली आहे. या परिस्थितीची पाहणी स्थानिक नगरसेवक आणि पुणे महापालिकेच्या अधिकार्यांनी केली. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी उपलब्ध पर्यायांवर चर्चा करून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. नदीत पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाकडे पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.
नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी भामा आसखेड पाइपलाइनमधून पाणी जोडणे आणि लष्कर पाणीपुरवठा विभागाकडून पाणी उपलब्ध करून घेण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच वाघोलीत बसविलेल्या टाक्यांमधून पाणीपुरवठा करण्यासह अतिरिक्त टाक्या उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पर्यायी व्यवस्था कार्यान्वित होण्यासाठी पाच ते सहा दिवस लागण्याची शक्यता असल्याने या काळात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
वाघोलीतील पाणीटंचाईचे प्रमुख मुद्दे
भीमा नदीची पातळी खालावल्याने वढू खुर्द बंधार्यातील पाणीसाठा संपला.
जॅकवेलमध्ये पाणी येत नसल्याने वाघोलीचा पाणीपुरवठा ठप्प.
भामा आसखेड पाइपलाइन आणि लष्कर विभागाकडून पाणी मिळविण्याचे नियोजन.
अतिरिक्त पाण्याच्या टाक्या उभारण्याचे प्रयत्न सुरू.
पर्यायी व्यवस्था सुरू होण्यासाठी पाच ते सहा दिवस लागू शकतात.
नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन.
प्रशासनाकडून पर्यायी पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू आहे. मात्र, नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा साठा जपून वापरणे आवश्यक आहे. अनावश्यक अपव्यय टाळून पाण्याचा वापर नियोजनपूर्वक करावा आणि पाणी बचतीसाठी सहकार्य करावे.
-रामभाऊ दाभाडे, नगरसेवक





