Pune District : चौफुला चौकात फुलविक्रेत्यांचा ठिय्या
Pune District : चौफुला चौकात काही वर्षांपूर्वी रस्त्यालगत मासेविक्रेते व्यवसायासाठी बसले होते. याचदरम्यान एक ट्रक थेट मासेविक्रेत्यांच्या दिशेने गेला होता.

वरवंड : पुणे – सोलापूर महामार्गावरील चौफुला चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फुलविक्रेते व्यवसायासाठी बसत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत आहे. वाहनांची वाढती गर्दी, रस्त्यालगत सुरू असलेली विक्री, अपुऱ्या वाहतूक नियोजनामुळे वाहनचालक, शेतकरी व प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
सोलापूरकडून शिरूर तसेच साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी चौफुला चौक हा महत्त्वाचा मार्ग आहे. या चौकातून दररोज अनेक लहान-मोठी वाहने ये-जा करतात. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फुलविक्रेते बसत असल्याने वाहनांना मार्ग काढताना अडचणी निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गर्दीच्या वेळी वाहतुकीचा वेग मंदावण्याची शक्यता असून, याचा त्रास स्थानिक नागरिकांसह महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे.
चौफुला चौकात काही वर्षांपूर्वी रस्त्यालगत मासेविक्रेते व्यवसायासाठी बसले होते. याचदरम्यान एक ट्रक थेट मासेविक्रेत्यांच्या दिशेने गेला होता. सुदैवाने यात जीवितहानी झाली नव्हती. मात्र, घटनेतून महामार्गालगत व्यवसाय करताना सुरक्षिततेची किती काळजी घेणे आवश्यक आहे. यापूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने आताच सावध भूमिका घेणे आवश्यक आहे.
फुलविक्रेत्यांच्या रोजगाराचाही विचार व्हावा!
फुलविक्री हा अनेकांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सोडवताना विक्रेत्यांच्या रोजगाराचाही विचार होणे आवश्यक आहे. विक्रेत्यांना थेट हटविण्याऐवजी त्यांच्यासाठी सुरक्षित आणि योग्य पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा विचार प्रशासनाने करावा. त्याचबरोबर महामार्गालगत वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे.





