Pune District : वेल्हेत महाराष्ट्र बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
Pune District : वेल्हे हा डोंगराळ व दुर्गम भाग असल्याने तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधून बँकेत येण्यासाठी नागरिकांना प्रवासाचे नियोजन करावे लागते. एसटी बस व सार्वजनिक वाहतुकीच्या मर्यादित फेऱ्यांमुळे नागरिकांना सोमवारी अथवा शुक्रवारीच तालुक्याच्या ठिकाणी येणे शक्य होते.

राजगड : वेल्हे येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत खात्याची ई-केवायसी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना व ग्राहकांना तासनतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. एका ई-केवायसीच्या कामासाठी अवघी पाच मिनिटे लागत असताना नागरिकांना तासनतास का प्रतीक्षा करावी लागते, असा उद्विग्न सवाल उपस्थित केला जात आहे. या भोंगळ कारभारामुळे बँकेच्या सेवा व्यवस्थापनाबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, शाखेतील उपव्यवस्थापक दिलीप पोपट पोळ यांच्या कामकाजाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
वेल्हे हा डोंगराळ व दुर्गम भाग असल्याने तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधून बँकेत येण्यासाठी नागरिकांना प्रवासाचे नियोजन करावे लागते. एसटी बस व सार्वजनिक वाहतुकीच्या मर्यादित फेऱ्यांमुळे नागरिकांना सोमवारी अथवा शुक्रवारीच तालुक्याच्या ठिकाणी येणे शक्य होते. अशा वेळी बँकेत पोहोचल्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना सोबत घेऊन येणाऱ्या पालकांना गर्दीचा व तासनतास चालणाऱ्या प्रतीक्षेचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचा संपूर्ण दिवस वाया जात असल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
काय आहेत नागरिकांच्या मागण्या?
ई-केवायसी कामासाठी स्वतंत्र काउंटर व अतिरिक्त कर्मचारी तात्काळ नियुक्त करावेत.
ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग ग्राहकांसाठी प्राधान्याने सेवा देणारी स्वतंत्र खिडकी सुरू करावी.
गर्दीच्या दिवशी गोंधळ टाळण्यासाठी सुटसुटीत ‘टोकन’ पद्धतीची अंमलबजावणी करावी.
सेवा व्यवस्थेची चौकशी करून दोषींवर सुधारात्मक कारवाई करावी.
एका ई-केवायसीच्या कामासाठी साधारणपणे पाच ते दहा मिनिटांचा कालावधी लागतो; मात्र एकाच वेळी बँकेत ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यास कामाला वेळ लागतो.
-दिलीप पोपट पोळ, उपव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, वेल्हे.





