Satara | अस्मितेच्या बाता मारणाऱ्यांचा स्वाभिमान फलटण, बारामतीला गहाण

सातारा, (प्रतिनिधी)- इथे बसून जनतेसमोर माण- खटावचा स्वाभिमान आणि अस्मितेबाबत बाता मारणाऱ्यांनी बारामती आणि फलटणला स्वाभिमान गहाण टाकला आहे. इथली उमेदवारी ठरवायला हे सगळे लाचार त्यांचे तळवे चाटत आहेत. माण- खटावच्या पाणीयोजना पूर्ण करण्यात अडथळे आणणाऱ्यांसाठी माझे विरोधक टाळ्या वाजवतात ही खरी शोकांतिका आहे, अशी टीका आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
बोराटवाडी येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. येळगावकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. गोरे म्हणाले, जीवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर आणि भक्कम पाठबळावर आजपर्यंतची १७ वर्षांची यशस्वी कारकीर्द घडली. माण- खटावच्या स्वाभिमानी मातीने आणि इथल्या माता- भगिनींनी मला नेहमीच आशिर्वाद दिले.
प्रत्येक निवडणुकीत विरोधकांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करुन मला अडवायचा प्रयत्न केला. करोना काळात जीवाच्या आकांताने रात्रंदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा करुन मी हजारो रुग्णांचे प्राण वाचवताना कधी पक्ष, गटतट पाहिला नाही. मोफत उपचार करण्यासाठी बॅंकेचे कर्ज घेतले.
तरीही बारामतीच्या सांगण्यावरुन माझ्यावर पैसे खाल्ल्याचा खोटा आरोप करण्यात आला. विरोधकांनी अशी षडयंत्रे रचून मला अडवायचा प्रयत्न केला आहे तेव्हा तेव्हा मी उसळी घेऊन नव्या जोमाने उभा राहिलो आहे. माझ्या पाठीशी जनतेचे आशिर्वाद नेहमीच राहिले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाण्याच्या बाबतीत जनतेला दिलेला शब्द पूर्ण करताना परमेश्वर माझ्या पाठीशी उभा राहिला. उरमोडी, जिहे कठापूर, तारळीचे पाणी आणले. टेंभूचे पाणी देणाऱ्या योजनेचे काम वेगाने सुरु केले आहे. माणच्या उत्तर भागाला पाणी दिले. उर्वरित २१ गावांसाठी योजना मंजूर करुन आणली.
औंधची पाणीयोजना मान्यतेच्या अंतिम टप्प्यात आहे. दुष्काळमुक्तीची लढाई मी अंतिम टप्प्यात आणली असताना पाण्याला विरोध करणाऱ्यांसाठी इथले विरोधी लाचार टाळ्या वाजवतात ही शोकांतिका आहे.
प्रत्येक गावात झालेली कोट्यवधींची कामे पाहून विरोधी इच्छुकांचे फिरणेही मुश्किल झाले आहे. माझ्यासमोर आता औद्योगिक वसाहत सुरु करायचे आणि शैक्षणिक क्रांती करायचे उद्दिष्ट आहे. भरकटलेल्या विरोधकांकडे मला अडविणे हेच एकमेव उद्दिष्ट असल्याने जनता त्यांना थारा देणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बारामती, फलटणकरांपुढे झुकणार नाही ….
माझी सुरुवातीपासूनची लढाई प्रस्थापितांविरोधात आहे. माझे राजकारण संपले तरी चालेल पण मी बारामती ,फलटणकरांपुढे झुकणार नाही. मी त्यांच्यापुढे झुकलो असतो तर माण- खटावच्या पाणीयोजना मार्गी लागल्या नसत्या. माझ्या कार्यकर्त्याला कधी मान खाली घालायला लागली नाही आणि यापुढेही लागणार नाही, असा विश्वासही आ. गोरेंनी व्यक्त केला.





