Satara : जयकुमार गोरे मंत्री होताच माण-खटावमध्ये जल्लोष

दहिवडी : राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात आ. जयकुमार कमल भगवानराव गोरे यांना संधी मिळताच माण-खटाव मतदारसंघात साजरा करण्यात आला. सलग चार वेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या आ. जयकुमार गोरे यांना मंत्रीपद मिळाल्याने दुष्काळी भागाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. आ. गोरेंची मंत्रीपदावर वर्णी लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. रविवारी सकाळी आ. गोरे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रीपदाची शपथ घेण्याविषयी फोन आला.
माण तालुक्याला यापूर्वी विधानसभेवर निवडून जात मंत्रीपदाची संधी यापूर्वी कधीच मिळाली नव्हती. विधानपरिषदेचे आ. महादेव जानकर यांना युतीच्या सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी मिळाली होती. निवडणूकीत त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवून ४९ हजार मतांच्या फरकाने सलग चौथ्यांदा विधानसभेत जाण्याचा मान मिळवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या आ. गोरेंनी माण – खटावसह जिल्ह्यातील इतर मतदारसंघात भाजप वाढीसाठी केलेले काम आणि पक्षाचे इतर उमेदवार निवडून आणण्यातही त्यांचा सहभाग असल्याची दखल भाजपाच्या वरिष्ठांकडून घेण्यात आली. भाजप आमदारांच्या प्रगतीपुस्तकातही आ. जयकुमार गोरे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने त्यांचे मंत्रीपद निश्चित मानले जात होते.
आ. गोरेंनी सुरुवातीपासून जिहेकठापूर, उरमोडी या पाणीयोजना हजारो कोटींचा निधी मिळवून मार्गी लावल्या. उरमोडीचे पाणी मतदारसंघात गेल्या ११ वर्षांपासून येत आहे. जिहेकठापूर योजनेचे पाणी दोन्ही तालुक्यात पोहचले आहे. आंधळी उपसा सिंचन योजना नव्याने मंजूर करुन आणून त्यांनी ती विक्रमी वेळेत पूर्णही केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांनी टेंभू योजनेसाठी फेरजलनियोजनातून अडिच टीएमसी पाणी उपलब्ध करुन घेतले आहे. या योजनेची कामेही सुरु झाली आहेत. गेल्या १५ वर्षात दुष्काळमुक्तीसाठी त्यांनी तब्बल साडेबारा हजार कोटींची निधी मिळवला आहे. येणाऱ्या तीन वर्षात मतदारसंघ दुष्काळमुक्त करण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. मतदारसंघात रस्त्यांचे जाळे निर्माण करुन त्यांनी दळणवळण सुलभ केले आहे.
देवाभाऊंनी शब्द पाळला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ सालीच आ. जयकुमार गोरेंना मंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता, मात्र त्यावेळी नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे भाजपला सरकार स्थापन करता आले नव्हते. गेल्या वर्षी दहिवडी येथील जाहीर सभेत फडणवीसांनी माण – खटावचा दुष्काळ संपवण्यासाठी जयकुमार गोरेंना सहकार्य करण्याबरोबरच त्यांना मंत्रीपद देण्याचा जाहीर शब्द दिला होता. काल झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात आ. गोरेंना कॅबिनेट मंत्रीपद देवून मुख्यमंत्री फडणवीस यांनी माण – खटावच्या जनतेला दिलेला शब्द पाळला आहे.
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. महायुती मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा बहुमान मिळणे ही माझ्या दृष्टीने भाग्याची बाब आहे. मंत्रीपदाची शपथ घेताना महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार मानून नव्या विकासपर्वाच्या वाटचालीत समर्पित भावनेने काम करण्याचा संकल्प करतो. महायुती मंत्रिमंडळात मंत्रिपदाची जबाबदारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार.
– आ.जयकुमार गोरे





