Satara | विधानसभा निवडणुकीत मीच जिंकणार

म्हसवड, (प्रतिनिधी)- यावेळच्या निवडणुकीत मी ३१ हजार मतांनी जिंकणार आहे. कारण माणदेशाचा दुष्काळाचा कलंक मी पुसलेला आहे. आता मला इथली जनता जिंकून देणार आहे. ज्यावेळी मी पडणार तेव्हा मी निवडणूक लढविणार नाही, मी डाग लागून देणार नाही, असे मत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
म्हसवड शहरातील २८ विकास कामांना मंजुरी मिळाली असून या कामाचा भूमिपूजन समारंभ उद्या दि. १४ रोजी होणार आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. गेल्या निवडणुकीत मी ३१०० मतांनी विजयी झालो.
आगामी निवडणुकीत ३१ हजार मतांनी विजयी होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. म्हसवड येथे स्वतंत्र तहसील कार्यालय मंजूर आहे. अप्पर तहसील कार्यालय सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.
आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून येथील मल्टिपर्पज हाॅल, सणगर समाजमंदिर, भुयारी गटार योजना, विविध समाज मंदिराचा सभामंडप आदी कामासाठी निधी मंजूर झाला आहे. जयकुमार गोरे म्हणाले, निवडणूक ही माझी लाईफलाईन आहे.
मी जमीनीवर राहून गेली पंधरा वर्षे काम करत आहे. कोणतेही काम मी करतो. कारण माण तालुक्यातील जनतेचा सर्वांगीण विकास हेच माझं ध्येय आहे. तहसील कार्यालय झाले तर लोकांची अडचणी दूर होतील. विकास होईल.
व्यवसाय वाढेल. अडचणीत असल्यावर माझ्याकडे लोक येतात. मात्र, म्हसवडच्या जनतेने विकास करुनही नगरपालिकेला आमच्या गटाला मतं दिली नाहीत. अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. पण म्हसवडमधील जनतेने मला विधानसभा निवडणुकीत पाच हजार मतांचे लीड दिलं आहे, हे मी कधीच विसरणार नाही. आगामी काळात पाणी प्रश्नाचा कायमचा सोक्षमोक्ष लावणार आहे.
शेवटच्या गावाला पाणी पोहचणार
जिहे कटापूर योजनेचं पाणी माण तालुक्यातील शेवटच्या गावात लवकरच विधानसभा निवडणुकीपूर्वी पोहचणार आहे. कारखेल. संभुखेड. नवीन सुधारित योजना मंजूर करण्यात आली आहे.
हिंगणी येथे लवकरच पाणी पोहचणार आहे. आता राजेवाडी तलाव पाऊस नसतानाही भरलेला आहे. म्हसवड एमआयडीसीचा प्रधानमंत्री गतीशिल योजनेत समावेश करणार आहे, अशी माहिती श्री. गोरे यांनी दिली.





