Satara | खटाव-माणमधील ४२ गावांची आज होणार स्वप्नपूर्ती

सातारा, (प्रतिनिधी) – खटावमधील मायणी, कलेढोणसह २१ आणि माण तालुक्यातील कुकुडवाडसह २१ अशा ४२ गावांचा दुष्काळ हटविणाऱ्या विस्तारित टेंभू उपसा सिंचन योजनेच्या कामांचे भूमिपूजन शुक्रवार, दि. ११ रोजी आ. जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि आ. सदाभाऊ खोत, माजी आ. दिलीपराव येळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.
दोन्ही तालुक्यातील ४२ पेक्षा अधिक गावांची स्वप्नपूर्ती लवकरच होवून पिढ्यानपिढ्याचा दुष्काळ हटणार असल्याने या भागात आनंद व्यक्त केला जात आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहिवडीतील जाहीर सभेत टेंभू योजनेचा लाभ खटाव आणि माण तालुक्यातील प्रस्तावित गावांना देण्याचा निर्णय झाल्याशिवाय विधानसभा निवडणुकीला आ. जयकुमार गोरे सामोरे जाणार नाहीत असा शब्द दिला होता. दोन्ही तालुक्यातील सुमारे ४२ गावांना टेंभूचे पाणी देण्यासाठी कृष्णा लवादाचे फेर जलनियोजन करणे गरजेचे होते.
देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतीकारी निर्णय घेऊन फेरजलनियोजनातून टेंभू योजनेसाठी अडीच टीएमसी पाण्याची तरतूद केली. या योजनेला साडेसातशे कोटींचा निधी मंजूर करुन ५३८ कोटींच्या कामांची निविदाही प्रसिद्ध केली.
आ. जयकुमार गोरे आणि सहकाऱ्यांच्या पाठपुराव्याने या योजनेला मूर्त स्वरुप आले आहे. आज या योजनेच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला दिलेला शब्द पाळत माण-खटाव दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल टाकले आहे.
टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात खटाव तालुक्यातील गारळेवाडी, कलेढोण, मायणी, अनफळे, ढोकळवाडी, विखळे, मुळीकवाडी, तरसवाडी, गारुडी, पाचवड, हिवरवाडी, पडळ दातेवाडी, धोंडेवाडी, पिंपरी मानेवाडी, पळसगाव, खातवळ कान्हरवाडी, कणसेवाडी, एनकूळ, कातरखटाव,
येलमरवाडी, डाळमोडी, बोंबाळे, डांभेवाडी, हिंगणे, सातेवाडी, तडवळे, मांडवे, पेडगाव तर माण तालुक्यातील विरळी, चिलारवाडी, वळई, पुकळेवाडी , ढाकणी, नरवणे, दोरगेवाडी, काळेवाडी (नरवणे), लोधवडे, किरकसाल, जांभुळणी, काळचौंडी, शेनवडी, महाबळेश्वरवाडी ,बनगरवाडी, वरकुटे मलवडी, कुरणेवाडी पळसावडे या गावांचा समावेश आहे.
टेंभू योजनेच्या पाइप आल्या..
टेंभू योजनेच्या कामांना आज विखळे येथे सुरुवात होत आहे. या योजनेच्या पाईपलाईनची सामग्री मायणी परिसरात येताच ग्रामस्थांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. लाभक्षेत्रातील गावोगावी सामग्री घेऊन आलेल्या वाहनांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले.





