Pune District : ऐन श्रावणात बहरला रानभाज्यांचा हंगाम
Pune District : श्रावण महिन्यात उपवास, पारंपरिक आहार व स्थानिक खाद्यपद्धतीला विशेष महत्त्व असते. रानभाज्या नैसर्गिक देणगी-रानभाज्या या सह्याद्रीच्या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहेत. पिढ्यानपिढ्या आदिवासी समाजाने त्यांची ओळख, उपयोग आणि पाककृती जपल्या आहेत.

रांजणी : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील सह्याद्रीच्या डोंगरदऱ्या, माळराने आणि शेतांच्या बांधांवर सध्या रानभाज्यांचा हंगाम बहरला आहे. यंदा पावसाला नेहमीपेक्षा लवकर सुरुवात झाल्याने श्रावणातच विविध प्रकारच्या रानभाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. निसर्गाच्या कुशीत कोणतीही मशागत, रासायनिक खत अथवा कीटकनाशकांचा वापर न करता उगवणाऱ्या या रानभाज्यांमुळे आदिवासी भागातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीला पुन्हा उजाळा मिळाला आहे.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाची रिपरिप सुरू होताच रानभाज्यांची कोवळी पालवी डोकावू लागते. जंगल, डोंगर उतार, शेतांचे बांध, माळरान तसेच झुडपांमध्ये या भाज्या नैसर्गिकरीत्या उगवतात. दरवर्षी रानभाज्यांचा मुख्य हंगाम साधारणतः भाद्रपद महिन्यात, म्हणजे ऑगस्टच्या अखेरीस आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला बहरतो. मात्र, यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने हा हंगाम जवळपास महिनाभर अगोदरच आला आहे. रानभाज्यांना पोषक वातावरण मिळाल्याने दुर्मिळ भाज्याही मुबलक प्रमाणात आढळत आहेत. श्रावण महिन्यात उपवास, पारंपरिक आहार व स्थानिक खाद्यपद्धतीला विशेष महत्त्व असते. रानभाज्या नैसर्गिक देणगी-रानभाज्या या सह्याद्रीच्या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहेत. पिढ्यानपिढ्या आदिवासी समाजाने त्यांची ओळख, उपयोग आणि पाककृती जपल्या आहेत. यंदा लवकर आलेल्या पावसामुळे या नैसर्गिक देणगीचा आस्वाद श्रावणातच घेता येत आहे.
शेकडो प्रकारच्या रानभाज्यांची परंपरा
रानभाज्यांमध्ये कंद, पालेभाज्या, फुलभाज्या, फळभाज्या, शेंगभाज्या तसेच बियांपासून तयार होणाऱ्या विविध प्रकारांचा समावेश होतो. माठ, चाव्याचा बार, रुखाळू, कुई, सायरथोड, चिचुरडे, चैताचा बार, कोंबाळ तेरा, करटुली, शेऊळ, लोथी, सतरा, हळंदा, शेवळे, कोरड, तेरे, कुडाची फुले, घोळ, रताळ्याचे कोंब, टेंभरण, भोपा, बोंडारा, चायवळ, भारंगी, चिचारडी, फांदी, शेवाळ, सापकांदा, म्हैसवेल आदी अनेक प्रकार सध्या रानमाळावर दिसून येत आहेत. या भाज्यांची ओळख, तोडणी आणि स्वयंपाकाची पद्धत पिढ्या न् पिढ्या आदिवासी समाजात जतन झाली आहे. डोंगरदऱ्यांमध्ये राहणारे नागरिक आजही जंगल व परिसरात फिरून या भाज्या गोळा करतात.
औषधी गुणधर्मांची परंपरागत माहिती
रानभाज्यांमध्ये विविध पौष्टिक घटक व पारंपरिक औषधी उपयोग असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. वाकळीचा वापर सर्दी, खोकला, ताप व दम्यासाठी केला जातो, तर कुडा पोटदुखीसाठी उपयुक्त मानला जातो. रानकेळाच्या कोंबांचा पारंपरिक वापर खोकल्यासाठी केला जातो. टाकळ्याच्या पानांचा लेप त्वचाविकारांवर लावण्याची पद्धत काही भागांत आढळते. करटुलीची भाजीही पारंपरिक आहारात आवर्जून केली जाते. मात्र, प्रत्येक रानभाजीची अचूक ओळख आणि योग्य प्रक्रिया महत्त्वाची आहे. काही रानवनस्पती दिसायला सारख्या असल्या तरी त्यातील काही अपायकारक असू शकतात.
चव आणि आरोग्याचा अनोखा संगम
म्हैसवेलाची पाने वेलवर्गीय असून त्यांची भाजी तसेच वड्या केल्या जातात. चाव्याच्या बाराच्या फुलांची कांदा-मिरचीसोबत परतून भाजी केली जाते. चिचारडी कडवट असली तरी स्थानिक पद्धतीने प्रक्रिया करून तिची भाजी केली जाते. रुखाळू अळूच्या पानांसारखे दिसते; त्याची योग्य पद्धतीने चिंच-गुळासोबत भाजी केली जाते. करटुली कारल्यासारखी दिसत असून तिची रस्सा किंवा कोरडी भाजी केली जाते. या पारंपरिक पाककृतींमुळे रानभाज्यांना वेगळी चव आणि ओळख मिळाली आहे. बदलत्या जीवनशैलीत पौष्टिक व स्थानिक आहाराचे महत्त्व अधोरेखित होत असताना रानभाज्यांकडे पुन्हा आकर्षण वाढत आहे.





