Pune District : मंत्री झिरवळांचा पीडित कुटुंबीयांना धीर
Pune District : तपासामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आळेफाटा : पिंपळवंडी येथील साडेनऊ वर्षीय मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणाने परिसर हादरला असताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनी या दुःखद प्रसंगी धीर दिला. तसेच या प्रकरणाचा तपास तातडीने पूर्ण करून दोषीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य मंगेश अण्णा काकडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पीडित कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर मंत्री झिरवळ यांनी या गंभीर प्रकरणाचा तपास तातडीने पूर्ण होण्यासाठी आपले लक्ष राहणार असल्याचे सांगितले. तपासामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण आग्रह धरणार असल्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी यावेळी सांगितले. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषीवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, यासाठी आपण या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. मंत्री झिरवळ यांच्या भेटीमुळे पीडित कुटुंबीयांना शासनाकडून या प्रकरणाचा गांभीर्याने पाठपुरावा होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. या घटनेचा तपास, दोषारोपपत्र आणि पुढील न्यायालयीन कारवाईकडे आता परिसराचे लक्ष लागले आहे.





