पुणे जिल्हा | कातकऱ्यांची राहत्या घराची नोंद सातबारावर करावी

भोर, (प्रतिनिधी) – कातकरी समाजाची वस्ती असलेल्या गावातील गायरान, सरकारी जमिनींबाबत आवश्यक ती कार्यवाही करून जमीन कातकरी कुटुंबाच्या नावे सातबारे करावेत. अशा सूचना आमदार संग्राम थोपटे यांनी महसूल विभागाला केल्या आहेत.
थोपटे म्हणाले, ‘नजर अंदाज पाहणी करून कातकरी समाजाला जातीचे दाखले देण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
त्यानुसार तालुक्यातील कातकऱ्यांना तातडीने दाखले द्यावेत. त्यांच्या नावावर जमीन करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. भोर, वेल्हे, मुळशी ‘आदिवासी’ तालुके म्हणून घोषित करावेत हा प्रस्ताव सरकारकडे पडून आहे.
लालफितीच्या कामाचा फटका, राजकीय भूमिका यामुळे त्यावर अजून कारवाई झाली नाही. नाग्या कातकरी यांच्या प्रतिमेचे भोर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
भोर येथील राजगड ज्ञानपीठ संचलित अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या जिमन्याशिअम हाॅलमध्ये आदिवासी कातकरी समाजाच्या मेळावा आणि जातीचे दाखले वाटप कार्यक्रमात थोपटे बोलत होते.
आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते भोर येथे कातकरी समाजातील व्यक्तींना जातीच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या वेळी ५१ जणांना कातकरी जातीचे दाखले देण्यात आले.
या वेळी तहसीलदार राजेंद्र नजन, पेण येथील आदिवासी कार्यकर्त्या दीपाली पाटील, आदिवासी समाजकृती समितीचे जिल्हाध्यक्ष नामदेव गंभीरे, कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन आनंद आंबवले, राजगड संचालक सुधीर खोपडे, सुभाष कोंढाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गितांजली आंबवले, तालुकाध्यक्ष नथू पवार, सीताराम जोशी आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन राजेंद्र शेटे यांनी केले.





