पुणे जिल्हा | स्वार्थासाठी निष्ठा बदलणारे राजकारणात अपारिपक्व

भोर, (प्रतिनिधी) – निवडणुकीच्या स्पर्धेत नसलेले प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात येण्यासाठी अज्ञानातून माझ्यावर चिखलफेक करण्याचे काम तालुक्यातील स्थानिक विरोधक करीत आहेत.
परंतु स्वार्थासाठी निष्ठा सोडून गेलेल्यांना जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिली.
ही मंडळी राजकारणातील अपरिपक्व असल्याचा टोला लगावून माझे नांव घेतल्याशिवाय यांना झोपच लागत नाही, असे मत व्यक्त करून रणजित शिवतरे यांनी केलेले आरोप आमदार संग्राम थोपटे यांनी खोडून काढले.
राष्ट्रवादीचे रणजित शिवतरे व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.४) घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार संग्राम थोपटे यांची दुटप्पी भूमिका घेऊन आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेतल्याचा आरोप केला होता.
त्यावर संग्राम थोपटे यांनी शनिवारी (दि.५) पत्रकार परिषद घेतली व आरोपांचे खंडन करून रणजित शिवतरे आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांवर हल्लाबोल केला.
यावेळी थोपटे म्हणाले की, रणजित शिवतरे यांच्या राजकारणाची मला कीव येते. कारण त्यांचा अभ्यास अपूर्ण आहे. आम्ही पालकमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केले. ते सन २०२४-२५ च्या निधीसाठी आणि आम्ही भोर नगरपालिकेतील कामांची भूमिपूजने केली, ती २०२३-२४ वर्षातील आहेत.
जिल्हा नियोजनमधील विकासकामांसाठी नगरपालिकेने ठराव करून दिले होते आणि मी जिल्हा नियोजनचा निमंत्रित सदस्य आहे. परंतु कोणत्याही पदावर नसणारे प्रकाशझोतात येण्यासाठी माझ्यावर आरोप करीत आहेत. माझ्यावर आरोप केल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही.
महायुतीने आत्मपरिक्षण करावे…
स्वतःला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हजारोंचे लीड मिळते. मग तुमच्या महायुतीच्या उमेदवाराला त्याच मतदारसंघातून लोकसभेला लीड का मिळवू शकले नाही, असा सवाल करून त्यांनी आत्मपरिक्षण करावे व बोलताना तारतम्य बाळगावे.
जनतेची कामे कोण करते आणि कोण निवडणुकीच्या वेळी जागे होतात याची जाणीव मतदारसंघातील सूज्ञ जनतेला आहे, असे या वेळी आमदार संग्राम थोपटे यांनी स्पष्ट करून रणजित शिवतरे यांची खिल्ली उडवली.





