भोर : लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यात मी सुद्धा येत असल्याने मी तीन निवडणुकीत मतदारसंघात कधीही दुजाभाव न करता विकासकामे केली असून जनतेच्या आशीर्वादावर मी ही निवडणूक लढवत असून मी तीनही तालुक्यात केलेल्या प्रचार दौर्यात जनतेचा कल माझ्या लक्षात आला आहे. मतदार मला साथ देतील, असा विश्वास आहे, असे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर संग्राम थोपटे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार थोपटे म्हणाले की, मतदारसंघात २०१९ ते २०२४ या पाच वर्षात विकास कामे केली आहे. पाच वार्षात ३ हजार १ कोटी खर्चाची कामे केली असून यात विविध योजनांमधील रस्त्यांची १८३३ रुपये खर्चाची कामे, इतर विकासकामांसाठी ४८४ कोटी, बंधारे, तलाव, कालवे, उपसा जलसिंचन योजनासाठी १५९ कोटी, आवास योजनासाठी १११ कोटी, ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी १०८ कोटी, भोर शहरात विकास कामासाठी ९३ कोटी, प्रशासकिय इमारती व संकुले यासाठी ७० कोटी, भाटघर वीर प्रकल्पातील बाधितांसाठी ५९ कोटी, प्रकल्प बाधितांची प्रस्तावित कामासाठी, ४१ कोटी, पीएमआरडीमधील रस्ते ४७ कोटी, पुरहाणी कार्यक्रम ४ कोटी खर्चाची अशी एकूण ३००१ कोटी रुपये खर्चाची कामे मंजूर करुन मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ते म्हणाले की, शिंदेवाडी भोरमार्गे वरंधा घाट रस्त्यासाठी ७२३ कोटी १३ लाखांचा निधी मंजूर केला असून कामही झाले आहे. रस्त्यामुळे पर्यटनाला वाव मिळणार आहे. कापूरहोळ भोर वाई ते सुरुरफाटा या ५७ किमी लांबीच्या रस्त्यासाठी ३४४ कोटी रुपये मंजूर केले. याही रस्त्याचे काम सात आठ महिन्यांत पूर्ण होईल. मतदारसंघात विकासकामांचा धडाका उठविला थोपटे म्हणाले की, खेड शिवापूर येथील टोल नाक्यावर आंदोलन करुन स्थानिकांना टोल वसुलीतून सुट मिळवून दिली आहे. मुळशी तालुक्यातील भरे येथे ३ कोटी खर्चाचे आंतरराष्ट्रीय क्रिडा संकुल उभारले जात आहे. हिंजवडीतील आयटी कंपन्या बाहेरच्या राज्यात जाऊ नयेत, यासाठी विधानसभेत आवाज उठवला आहे. मतदारसंघात विकासकामांच्या प्रगतीचा धडाका उठवल्याने मतदारसंघातील जनता महाविकास आघाडीच्या पाठिशी ठाम आहे. नजीकच्या काळात पर्यटन, औद्योगिक विकासातून तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे माझे व्हिजन असल्याचे आमदार थोपटे यांनी आवर्जून नमूद केले.