पुण्यातील ग्रँड दहीहंडीची शान; सिद्धार्थ कॉलनी गोविंदांनी फोडली दहीहंडी
विश्रांतवाडी : धानोरीतील सामाजिक कार्यकर्त्या पूजा जाधव व धनंजय जाधव फाऊंडेशनच्या वतीने ग्रँड दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दहीहंडी फोडण्याचा मान चेंबूर येथील सिद्धार्थ कॅालनी गोविंदा पथकाने पटकावला. फाऊंडेशनच्या वतीने गोविंदा पथकाला रोख रक्कमेसह मानाची ट्रॅाफी देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी इस्कॅानचे श्रीमान रूक्मिणी चरण प्रभु भक्तिशास्त्री यांच्या हस्ते प्रभु श्रीकृष्णांची सामूहिक आरती करण्यात आली. धनंजय जाधव फाऊंडेशनचे मार्गदर्शक स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित राहून गोपाळकाला व दहीहंडी महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी आवर्जून हा सोहळा देखील पाहिला.
सोहळ्या दरम्यान वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापू पठारे, माजी आमदार सुनिल टिंगरे, प्रशांत जगताप, खासदार मुरलीधर मोहोळ यांचे मोठे बंधू प्रभाकर मोहोळ, बॅाबी टिंगरे, अलका खाडे, आशुतोष जाधव, संदिप मोझे, हनुमंत परांडे, शशी टिंगरे, सुहास टिंगरे, विशाल टिंगरे, नवनाथ पठारे, सुभाष चव्हाण, दिलीप डाळिमकर, विनोद मोरे , विनोद परांडे, संदिप दांगट यांच्यासह अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.
दहीहंडी सोहळ्यात सहभागी पथकातील गोविंदा तसेच हजारोंच्या संख्येने उपस्थित तरुणाईने गाण्यांच्या तालावर नाचून आनंद लुटला. त्याचबरोबर इंडियन आयडॉल फेम अभिजीत सावंत यांच्या दमदार सादरीकरणामुळे हजारो गोविंदा प्रेमी प्रेक्षकांची मने जिंकली. बॅालिवुड डान्स, कॅामेडीसह डीजे साऊंड, लाईट्स आणि ढोलवादन पाहण्यासाठी धानोरी,लोहगाव, कळस,विश्रांतवाडी, मुंजाबावस्ती, भैरवनगर, गोकुळनगर व पोरवाल रस्त्यावरील सोसायटीमधील मोठया संख्येने जनसागर लोटला होता.
या सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहकार्य केले. त्याचबरोबर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनंजयभाऊ जाधव यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याबद्दल कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक पूजा जाधव यांनी सर्वांचे मनस्वी आभार मानले.





