पुणे जिल्हा | वीसगाव खोऱ्यातील भात तरवे तरारले

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यात गेल्या दहा बारा दिवसांपूर्वी झालेला जोरदार पाऊस तसेच अधूनमधून पडत असलेल्या रिमझिम जलधारांमुळे पेरणी केलेल्या भाताच्या तरव्यांची उगवण चांगल्यापैकी झाली असून तरवे हिरवेगार दिसू लागले आहेत. गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे भातांची रोपं तरारली आहेत.
मे महिन्याच्या शेवटच्या व जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केलेल्या भाताच्या रोपांची उगवण सगळीकडे झाली आहे. यामुळे सद्य परिस्थितीत तरी शेतकरी पावसाबद्दल समाधान व्यक्त करीत आहे. आठ दिवसांपूर्वीच्या वातावरणात बदल होऊन आता ढगाळ वातावरण झाले आहे.
यावर्षी पेरणी झाल्यानंतर वेळेवर पाऊस झाल्याने भात पिकाची उगवण चांगली झाली आहे. विशेष करून तरव्यातील दाणा पावसात वाया गेला नसल्याने सर्वच दाण्यांची उगवण चांगली झाल्याने तरवे दाट व हिरवेगार दिसत असल्याचे खानापूर येथील येथील शेतकरी संदीप मारुती थोपटे यांनी सांगितले.





