धोक्याची घंटा..! पुढील चार तास महत्वाचे, जालन्याला रेड अलर्ट, मराठवाडा-विदर्भाचा संपर्क तुटला

मुंबई : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने राज्यभरात थैमान घातले आहे. नांदेड, हिंगोली, धाराशिव, लातूरमध्ये पुन्हा एकदा पावसाने वादळी वा-यासह झोडपले. आधीच्याच पावसामुळे शेतकरीराजा संकटात सापडला होता. त्यात आता पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवला आहे.
जालना जिल्ह्याला पुढील चार तास रेड अलर्ट
मुसळधार पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशातच आता हवामान विभागानं जालना जिल्ह्याला पुढील चार तास रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्शवभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
हिंगोली-पुसद मार्ग वाहतुकीसाठी बंद
दरम्यान, मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी हिंगोली-पुसद हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील माळेगाव परिसरात पूर परिस्थितीमुळे शेतक-यांसह वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक वाहने रस्त्यावर अडकून पडली आहेत. दुसरीकडे लातूर जिल्ह्यातील मन्याड नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. शेणकुडमधील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
राज्यात पुन्हा एकदा मुसळधार
पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील ४८ तास राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. लातूर, धाराशिव, हिंगोली आणि नांदेडमध्ये शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजला सुटी जाहीर
जिल्हाधिका-यांनी खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजला सुटी जाहीर केली आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवला आहे. पुढील दोन दिवस राज्यात अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाकडून आज शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यात महापूर येण्याची शक्यता?
सोलापूर जिल्ह्यात सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. सोलापूरसह अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यात पाऊस झाला तर पुन्हा सोलापूर जिल्ह्यात महापूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लातूर जिल्ह्यात मागील २४ तासांपासून पावसाने धुमाकूळ घातला असून अजूनही पाऊस सुरूच आहे. मागील २४ तासांत लातूर जिल्ह्यात ७५.३ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील ६० महसूल मंडळांपैकी तब्बल ३७ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून सर्वाधिक १३७ मिलिमीटर पावसाची नोंद अहमदपूर तालुक्यात झाली आहे.
५७ हजारांवर पशुधनाचे नुकसान
मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात घरे, दुकाने, शेती, पिके पाण्याखाली गेली असून जनावरेही वाहून गेली आहेत. पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबरपर्यंत राज्यात १ हजार ६०१ मोठी जनावरे, १ हजार ७९९ लहान जनावरे आणि ५४ हजार ३३८ कोंबड्यांची जीवितहानी झाली आहे. यासोबतच मराठवाड्यात आणि पूरग्रस्त भागांमध्ये जनावरांच्या मृत्युमुखी पडण्याचा आकडा वाढत असून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत आहे.




