Maharashtra Rain News : यावर्षी मान्सूनवर एल निनोचा परिणाम होणार असल्याने २०२६ या वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे,असा अंदाज स्कायमेट ह्या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर ह्या ४ महिन्यांच्या कालावधीत मान्सूनचे पर्जन्यमान सरासरीच्या ९४ टक्के असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. तसेच, हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीत एल निनोची तीव्रता वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Rain News) जून महिन्यात मान्सून तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता असली, तरी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे. देशातील मध्य आणि उत्तर-पश्चिम भागांत पावसाची कमतरता जाणवू शकते. यामुळे शेती आणि जलस्रोतांवर परिणाम होण्याची भीती आहे. तसेच, भारतीय हवामान विभागाकडून पुढील आठवड्यात मान्सून हंगामासाठीचा आपला पहिला अंदाज जाहीर करण्याची शक्यता आहे. देशातील एकूण वार्षिक पावसाच्या सुमारे ७० टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या दक्षिण-पश्चिम मान्सूनमुळे मिळतो. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा असलेल्या कृषी क्षेत्रासाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे. देशातील १४० कोटींहून अधिक लोकसंख्येपैकी अर्ध्याहून अधिक लोक शेतीवर अवलंबून आहेत. खरीप हंगामातील बहुतांश पेरण्या जून आणि जुलै महिन्यात होत असल्याने मान्सूनचे वेळेवर आगमन आणि वितरण हे महत्वाचे ठरते. (Maharashtra Rain News)