टेन्शन वाढलं..! राज्यातील ‘या’ 31 जिल्ह्यांना यलो अलर्ट; आजही मुसळधार कोसळणार

Weather Alert : महाराष्ट्रात गेल्या चार दिवसांपासून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसानं महापुराचं थैमान घातलं आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाचा जोर कायम आहे. भारतीय हवामान विभागानं आजही (२६ सप्टेंबर) राज्यातील तब्बल ३१ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
यामध्ये अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. हवामान खात्यानं राज्यातील ९७ टक्के नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळं शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून, उभी पिकं, घरं आणि जनावरं वाहून गेली आहेत. या संकटातून नागरिक अजून सावरलेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारची (२८ सप्टेंबर) एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलून ९ ऑक्टोबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, राज्य सरकारनं नुकसानीचं पंचनामे सुरू केले असून, केंद्र सरकारच्या मदतीनं लवकरच मोठी मदत जाहीर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कालच (२५ सप्टेंबर) मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी दिल्लीला भेट दिली.





