Weather Alert : राज्यात पावसाचं कमबॅक..! ‘या’ भागात विजांसह जोरदार कोसळणार; हवामान खात्याचा अलर्ट

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात मॉन्सूनने बहुतांश भागातून माघार घेतली असली, तरी पावसाला पोषक वातावरण कायम आहे. हवामान खात्याने आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याचवेळी, राज्यात उन्हाचा चटका जाणवत असून, काही भागांत कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.
आजचा हवामान अंदाज (15 ऑक्टोबर)
हवामान विभागानुसार, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग; मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली; मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. ठाणे, रायगड, जळगाव, नाशिक जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात मात्र कोरडे हवामान आणि उन्हाचा तडाखा कायम राहील.
उद्याचा हवामान अंदाज (16 ऑक्टोबर)
गुरुवारी कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड; मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा; मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव येथे विजांसह पावसाची शक्यता आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार, मुंबई, ठाणे आणि पालघर येथे तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
शुक्रवारचा हवामान अंदाज (17 ऑक्टोबर)
शुक्रवारी पालघर आणि नाशिक जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव येथे तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
मॉन्सूनची माघार आणि हवामानातील बदल
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत मॉन्सून संपूर्ण देशातून माघार घेण्याची शक्यता आहे. सध्या मॉन्सूनच्या परतीची सीमा कारवार, कलबुर्गी, निजामाबाद, कांकेर, चांदबली दरम्यान आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्याची स्थिती कोमोरीन भागाकडे सरकत असून, लक्षद्वीप, केरळ आणि दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत रविवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. यामुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.





