Pune District : वाल्मिकी नगरीत माऊलींचा सोहळा विसावला
Pune District : दुपारी सव्वाबारा दरम्यान पालखीचा नगारखाना व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्हेनगरीच्या वेशीवर पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

वाल्हे : संपदा सोहळा नावडे मनाला । करीतें टकळा पंढरीचा ॥१॥
जावें पंढरिसी आवडी मनासी। कधीं एकादशी आषाढी हे ॥२॥
तुका म्हणे ऐसें आर्त ज्याचे मनीं। त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥३॥
असे अभंग गात, विठ्ठल दर्शनाची भावना मनी ठेवून कपाळी बुक्का, गंध लावून खांद्यावर भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णवांनी टाळ-मृदंगांच्या गजरात आद्य रामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषींच्या वाल्हेनगरीत (ता. पुरंदर) येथे माउलींचा पालखी सोहळा दुपारी विसावला.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीचा निरोप घेऊन पहाटे सहाच्या सुमारास टाळ-मृदंगांचा गजर व हरिनामाच्या जयघोषामध्ये पालखी सोहळा वाल्हेनगरीकडे मार्गस्थ झाला. सकाळी अकरा सुमारास दौंडज ग्रामपंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. दुपारी सव्वाबारा दरम्यान पालखीचा नगारखाना व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्हेनगरीच्या वेशीवर पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. प्राजक्ता दुर्गाडे, सरपंच अतुल गायकवाड, उपसरपंच सागर भुजबळ, वागदरवाडी सरपंच सुनील पवार, सुकलवाडी सरपंच संदेश पवार, माजी सभापती गिरीश पवार, सामाजिक कार्यकर्ते बजरंग पवार, माजी सरपंच अमोल खवले, दत्तात्रेय पवार, पिंगोरी माजी सरपंच जीवन शिंदे, प्रकाश शिंदे, अतुल नाझरे, सचिन देशपांडे, प्रा. संतोष नवले, उद्योजक गोरख कदम, अर्थव पवार, अनिल भुजबळ, तुषार भुजबळ, ग्रामस्थ, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, स्वागतानंतर, फक्त अडीच किलोमीटरवर असलेल्या सुकलवाडी फाट्यानजिक पालखीतळावर पालखी सोहळा पोहोचण्यास तब्बल सव्वा तास लागला. पालखी तळाकडे जाण्यासाठी असलेल्या रेल्वेच्या भुयारीमार्गत वाहनांची व वैष्णवांची गर्दी जास्त प्रमाणात झाल्याने पालखी सोहळा पोहोचण्यास उशीर झाला. पालखी सोहळा तळावर पोहोचल्यानंतर पालखी रथामधून काढून ग्रामस्थांच्या खांद्यावर देण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन नाचवत पालखी विसाव्याला प्रदक्षिणा घातली. चोपदारांनी सूचना केल्यानंतर वैष्णवांच्या उपस्थितीत समाजआरती झाली. आरतीनंतर माऊलींचा पालखी सोहळा विसावला. यावेळी भाविकांनी दुतर्फा रांगा लावून माऊलींचे दर्शन घेण्यास सुरुवात झाली.
यावेळी प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे, योगी निरंजन नाथ, कबीर महाराज, ॲड. रोहिणी पवार, बाळासाहेब चोपदार, उद्धव चोपदार, राजाभाऊ चोपदार, श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम रजपूत, प्रभारी गटविकास अधिकारी अनिवाश थोरात, जेजुरी पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक केशव जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे, मंडल अधिकारी प्रमोद झुरंगे, ग्रामविकास अधिकारी जयेंद्र सुळ, तलाठी सागर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बुधवार (दि.१५) सकाळी सहा वाजता नीरा स्नानासाठी मार्गस्थ होणार असून संध्याकळी लोणंद येथे मुक्कामी जाणार आहे.
उद्योजक बावळेकर यांच्याकडून सेवाभाव
माळवाडी येथे दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, महाबळेश्वर येथील उद्योजक दत्तात्रय हरिभाऊ बावळेकर, माया चॅरिटेबल फाऊंडेशन पुणे-पिंपरी-चिंचवड अग्रवाल परिसरात यांच्या वतीने जेवण, वाल्हे येथील अमृता प्रिंटर्स प्रेस, माळवाडी येथे गीतांजली भुजबळ यांच्या माध्यमातून पिण्याचे स्वच्छ पाणी वैष्णवासाठी मोफत उपलब्ध केले होते. वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने ठिकठिकाणी सोहळ्यासाठी सुविधा दिल्या होत्या.
सामाजिक संघटनांचा मोठा सहभाग
वाल्हे आडाचीवाडी येथील अमर तरुण मंडळ यांच्या वतीने पाण्याची बाटली, चिक्की वाटप, प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे सर मित्र परिवार, उद्योजक गोरख कदम यांच्या वतीने यांच्या वतीने बिस्किट, केळी, पाणी बॉटल, मसाले भात, शिरा यांचे वाटप, तसेच भाजपचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते यांच्या वतीने खिचडी वाटप केले. क्रांतीसूर्य समता विकास प्रतिष्ठान, आदर्श सामाजिक फाऊंडेशन बिस्किट व राजगिरा लाडू, पोहे वाटप करण्यात आले. पै. संदीप मोडक व सुकलवाडी माजी उपसरपंच अमित पवार मित्र परिवार यांच्या वतीने अन्नप्रसाद सेवा देण्यात आली.





