Pune District : डफावर थाप मारत ठिय्या आंदोलन; शिरूर नगर परिषदेसमोर ‘लहुजी शक्ती सेने’ची निदर्शने
Pune District : मागील काही महिन्यांत सर्व मुद्द्यांबाबत प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

शिरूर : शिरूर शहरातील विविध प्रलंबित आणि गंभीर प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘लहुजी शक्ती सेना’ संघटनेच्या वतीने शिरूर नगर परिषद कार्यालयासमोर भर उन्हात शांततापूर्ण मार्गाने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी प्रशासनाविरोधात घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
आंदोलनात दादाभाऊ लोखंडे, भाऊसाहेब जाधव, विनोद साठे, रियाज सय्यद, तुषार भवाळ, सुमनताई साळवे, अविनाश साबळे, प्रशांत साळवे, विश्वास पाटोळे, सोनुभाऊ काळोखे, ओंकार आढागळे, सुमित बागवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मागील काही महिन्यांत सर्व मुद्द्यांबाबत प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे शेवटी प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी आणि मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
शिरूर शहरातील बेकायदेशीर बांधकामे तातडीने निष्कासित करावीत, वाढीव अतिक्रमणे हटवावीत, विशेषतः पूर रेषेखालील असणारी सर्व अतिक्रमणे आणि बांधकामे तत्काळ हटवावीत, कान्होबा (कानिफनाथ मंदिर) परिसरातील सर्व अतिक्रमणे तातडीने काढावीत, आरोग्य व दाखल्यांची तपासणी: स्वच्छता निरीक्षकांची जिल्हा शल्य चिकित्सक, ससून पुणे यांच्यामार्फत आरोग्य तपासणी करण्यात यावी. तसेच, बांधकाम अभियंत्यांनी दिलेल्या पूर्णत्व दाखल्यांची सखोल तपासणी करून, एका वर्षात किती दाखले दिले गेले याची लेखी माहिती उपलब्ध करून देण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. लहुजी शक्ती सेनेचे युवक जिल्हाध्यक्ष विशाल जोगदंड यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.





