Pune District : पुणे-नाशिक महामार्गाला वाहतूक कोंडीचे ग्रहण
Pune District : साईड गटारे तुंबल्याने आणि सखल भागातील अतिक्रमणांमुळे पुराचा निचरा होत नसल्याने अनेक वाहने रस्त्यातच बंद पडत आहेत.

चिंबळी : चाकण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (NH-60) चाकण ते भोसरी आणि मोशी दरम्यानची वाहतूक कोंडी दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालली आहे. प्रशासनाचे दावे आणि विविध उपाययोजना कागदावरच राहत असल्याने, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नोकरदार, कामगार आणि सर्वसामान्यांना दररोज अनेक तास कोंडीत अडकून पडावे लागत आहे.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे चाकण चौक, तळेगाव चौक, वाकी फाटा आणि सूर्या इलेक्ट्रॉनिक्स परिसरातील रस्त्यांवर ओढ्यासारखे पाणी साचले आहे. साईड गटारे तुंबल्याने आणि सखल भागातील अतिक्रमणांमुळे पुराचा निचरा होत नसल्याने अनेक वाहने रस्त्यातच बंद पडत आहेत. यामुळे वाहतुकीचा वेग प्रचंड मंदावला असून, वाहनांच्या ४ ते ५ किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. अवजड वाहनांची अनिबंध वर्दळ: चाकण औद्योगिक वसाहत असल्यामुळे या मार्गावर अवजड कंटेनर्स आणि ट्रकची संख्या प्रचंड आहे. पायाभूत सुविधांची कामे: महामार्गावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. तसेच सिग्नल यंत्रणा बंद असल्याने गोंधळ अधिक वाढतो.
अतिक्रमणे आणि बेशिस्त वाहतूक
रस्त्यांच्या कडेला झालेली अतिक्रमणे आणि चालकांकडून होणारी लेनची शिस्त न पाळण्याची प्रवृत्ती कोंडीत भर घालत आहे. या कोंडीचा सर्वाधिक फटका चाकण एमआयडीसीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसत आहे. कंपन्यांच्या शिफ्ट बदलण्याच्या वेळेत कामगारांचे तास खोळंबत आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही या कोंडीतून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पीएमआरडीएद्वारे २६१ कोटी रुपयांच्या चार मिसिंग लिंक्सचे काम हाती घेण्यात आले आहे. यासोबतच नाशिक फाटा ते राजगुरुनगर दरम्यान २८ किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रस्तावित आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल. परंतु, हे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत नागरिकांना या त्रासातून सुटका मिळण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.





