Pune District : पावसाच्या उघडिपीने शेतीकामांना वेग
Pune District : जुलैच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीनंतर जमीन वाफशावर आल्यामुळे बळीराजाने शेतात पेरणी यंत्रे आणि पारंपरिक औते धावून खरीप हंगामातील पेरण्या सुरू केल्या आहेत.

चिंबळी : गेल्या आठवड्याभरापासून संततधार पावसाने विश्रांती घेत चांगली उघडीप दिली असल्याने खेड तालुक्यातील ग्रामीण भागासह चाकण औद्योगिक क्षेत्राला लागून असलेल्या पट्ट्यात शेतीच्या मशागतीला आणि पेरणीच्या कामांना वेग आला आहे. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीनंतर जमीन वाफशावर आल्यामुळे बळीराजाने शेतात पेरणी यंत्रे आणि पारंपरिक औते धावून खरीप हंगामातील पेरण्या सुरू केल्या आहेत.
वाफसा आल्याने पेरणीला सुरुवात: तालुक्यात ३ ते ८ जुलैदरम्यान झालेल्या मुसळधार पाऊस व अतिवृष्टीनंतर गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतात साचलेले पाणी ओसरून जमीन पेरणीयोग्य झाली आहे. कुरुळी, आळंदी, मरकळ, केळगाव, सोळू व धानोरे या औद्योगिक क्षेत्राला जोडलेल्या ग्रामीण भागातील गावांमध्ये शेतकऱ्यांची बियाणांची खरेदी आणि पेरणीसाठीची लगबग वाढली आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात रोपवाटिका व पुनर्लागवडीच्या कामांनी वेग घेतला आहे. तर मध्य व पूर्व पट्ट्यात सोयाबीन, मका, आणि भुईमूग या खरीप पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. बोगस बियाण्यांचे संकट टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना घरच्या घरी उगवण क्षमता तपासूनच बीजप्रक्रिया करून पेरणी करण्याचे आवाहन केले आहे. शेतकरी व मजुरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून चालू हंगामात पावसाने ओढ दिल्याने सुरुवातीला पेरण्या खोळंबल्या होत्या.
मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने आणि आता मशागतीसाठी योग्य सूर्यप्रकाश मिळत असल्याने तालुक्यात सर्वत्र ट्रॅक्टर आणि बैलजोड्यांच्या साहाय्याने काळ्या मातीत तिफण चालली आहे. ग्रामीण भागातील महिला मजूर आणि शेतकरी कुटुंब सामूहिकरीत्या शेतीकामे पूर्ण करण्यात व्यस्त आहेत.
अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले होते, पण गेल्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती दिल्यामुळे जमीन सुकली आहे. उशीर झाला असला तरी आता पेरणी योग्य वातावरण असल्याने आम्ही सोयाबीन आणि मक्याची पेरणी उरकून घेत आहोत.





