Pune District : भीमाशंकर खोऱ्यातील भातशेती उद्ध्वस्त
Pune District : नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप हंगामातील भात उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आदिवासी शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

रांजणी : भीमाशंकर आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील भीमाशंकर पाटण व आहुपे खोऱ्यात मागील आठवड्यात सलग चार दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचून राहिले. त्यामुळे नुकतीच अंकुर फुटू लागलेली भातरोपे चिखलाखाली गाडली, तर अनेक ठिकाणी वेगवान पाण्याच्या प्रवाहामुळे उगवलेली रोपे वाहून गेली आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप हंगामातील भात उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आदिवासी शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
यंदाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने मशागत करून पेरणी केली होती. वेळेवर झालेल्या पावसामुळे भाताची उगवण चांगली झाली होती. मात्र, मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने काही तासांतच शेतकऱ्यांची अनेक महिन्यांची मेहनत वाया गेली. अनेक शेतांमध्ये पाण्याचा निचरा न झाल्याने भाताचे अंकुर चिखलात गाडले गेले, तर काही भागात गाळाचा मोठा थर साचल्याने पुन्हा लागवड करणेही कठीण झाले आहे.
डोंगराळ परिसरातील भातशेतांचे बांध अनेक ठिकाणी फुटल्याने पाण्याचा वेग अधिक वाढला, या पाण्याबरोबर माती आणि भातरोपे वाहून गेल्याने अनेक शेतांचे स्वरूपच बदलून गेले आहे. काही ठिकाणी संपूर्ण शेत सपाट झाले असून, शेतकऱ्यांना नव्याने बांधबंदिस्ती करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे अतिरिक्त खर्चाचा बोजा वाढणार असून आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या आदिवासी कुटुंबांची चिंता अधिक वाढली आहे.
मुसळधार पावसामुळे भीमाशंकर पाटण व आहुपे खोन्यातील भातशेतांमध्ये पाणी साचून अंकुरलेली भातरोपे चिखलाखाली गाडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भीमाशंकर व आहुपे खोऱ्यातील बहुतांश कुटुंबांचा प्रमुख उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. भात हे येथील मुख्य पीक असल्याने या पिकाचे झालेले नुकसान म्हणजे वर्षभराच्या उत्पन्नावरच घाला असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
त्यामुळे महसूल व कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करावेत, शासनाने विशेष आर्थिक मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाने कार्यालयात बसून अहवाल मागविण्याऐवजी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांतून होत आहे.
पंचनाम्यांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा
पंचनाम्यांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळाल्यास पुढील शेतीकामांसाठी मदत होईल, असेही शेतकरी सांगत आहेत. बांध फुटल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात भातरोपे वाहून गेली. अनेक शेत पूर्णपणे सपाट झाली आहेत. आमच्या भागात शेती हाच उत्पन्नाचा मुख्य आधार असल्याने नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे.
– रमेश लोहकरे, माजी सरपंच, आहुपेअंकुरलेली भातरोपे चिखलाखाली गाडली आहेत. बांध फुटून शेत सपाट झाले आहेत. पंचनामे करून तातडीच्या नुकसानभरपाईची आदिवासी शेतकऱ्यांची मागणी आहे. नुकसानग्रस्त भातशेतीचे तातडीने पंचनामे करावेत. महसूल व कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करावी. आदिवासी शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदत जाहीर करावी. पुन्हा लागवडीसाठी बियाणे व कृषी निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात.
– संजय शेळके, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर.





